उत्तर कोरियाविरोधातील युद्धविषयक धोरण ‘अपडेट’ करा

-दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश

south koreaसेऊल – उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्रांच्या धोक्याला उत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियाने आपले युद्धविषयक धोरण अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक -येओल यांनी याचे आदेश दिले. गुरुवारी राष्ट्राध्यक्ष येओल यांनी राजधानी सेऊलमधील ‘मिलिटरी बंकर’ला भेट दिली. या बंकर युद्धाच्या काळात कमांड पोस्ट म्हणून कार्यरत असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. त्याचवेळी या देशाकडून नव्या अणुचाचणीची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने आक्रमक धोरण स्वीकारत आपली संरक्षणक्षमता वाढविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. गेल्याच महिन्यात, राष्ट्राध्यक्ष युन सूक -येओल यांनी नवे धोरणात्मक कमांड सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ दक्षिण कोरिया व अमेरिकेचा व्यापक संरक्षणसरावही सुरू आहे.

त्यानंतर आता दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविषयक धोरणात बदल करण्याचे आदेश देऊन उत्तर कोरियाविरोधातील आक्रमक धोरण कायम राहिल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘दक्षिण कोरियन जनतेची व संपत्तीच्या सुरक्षेची हमी देणे गरजेचे असून त्यासाठी उत्तर कोरियाच्या धोक्यांविरोधातील योजना अद्ययावत करणे महत्वाचे ठरते’, असे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी म्हटले आहे.

leave a reply