अमेरिकेची सौदीला तीन हजार स्मार्ट बॉम्ब्स पुरविण्याची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सौदी अरेबियाला २९ कोटी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करण्याची घोषणा केली. यानुसार अमेरिका सौदीला तब्बल तीन हजार ‘जीबीयू-३९ एसडीबी१’ हे स्मार्ट बॉम्ब पुरविणार आहे. इराणकडून पर्शियन आखातात सुरू असलेल्या हालचाली आणि या क्षेत्रातील तणाव वाढत असताना अमेरिकेने सौदीसाठी सदर सहाय्य जाहीर केले. दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीबरोबर केलेल्या लष्करी सहकार्यावर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अमेरिकेकडून सौदीला होणारी शस्त्रास्त्रांची निर्यात बंद करण्याचा इरादाही बायडेन यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी आखातातील आपल्या अरब मित्रदेशांसाठी जवळपास ३० कोटी डॉलर्सच्या शस्त्रविक्रीची घोषणा केली. यामध्ये सौदी अरेबियासाठी २९ कोटी डॉलर्सचे बॉम्ब्स, दारुगोळा, सहाय्यक युद्धसाहित्य, सुटे भाग आणि तंत्रज्ञानविषयक सहाय्याचा समावेश असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ने स्पष्ट केले. तर इजिप्तसाठी साडे दहा कोटी डॉलर्सहून अधिक किंमतीची क्षेपणास्त्रे आणि कुवैतसाठी अपाचे हेलिकॉप्टर्सच्या विक्रीचीही घोषणा यावेळी करण्यात आली.

यापैकी सौदी अरेबियासाठी अमेरिका ३,००० ‘जीबीयू-३९ स्मॉल डायामेटर बॉम्ब १’ या स्मार्ट बॉम्बचा समावेश आहे. ‘वर्तमान आणि भविष्यातील धोक्यांना प्रत्युत्तर देणार्‍या व हवेतून जमिनीवर मारा करणार्‍या या लांब पल्ल्याच्या स्मार्ट बॉम्बमुळे सौदीच्या सामर्थ्यात वाढ होईल’, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. सदर स्मार्ट बॉम्ब अचूक मारा करणारे असून यामुळे आनुषंगिक नुकसान अर्थात कोलॅट्रल डॅमेज कमी होईल, असा दावा पेंटॅगॉनने केला.

या व्यतिरिक्त अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गेल्या आठवड्यातच सौदीसाठी हवेतून जमिनीवर मारा करणार्‍या ७५०० बॉम्बच्या विक्रीसंबंधी परवाना जारी करण्याचे जाहीर केले होते. तर ‘संयुक्त अरब अमिरात’साठी (युएई) देखील अमेरिकेने ‘एफ-३५’ या अतिप्रगत लढाऊ विमानांच्या विक्रीबाबतचा निर्णय याच महिन्यात घेतला. इराणबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखातातील आपल्या अरब मित्रदेशांना लष्करी सहाय्य पुरविण्याबाबत घेतलेल्या निर्णयांकडे पाहिले जाते.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे अवघ्या काही दिवसांसाठी अमेरिकेच्या सत्तेवर आहेत. त्यानंतर इराणच आखाती देशांचा शेजारी असेल, याची आठवण करून देऊन इराणने अरब देशांना इशारा दिला होता. या व्यतिरिक्त इराणने गेल्या काही दिवसांपासून पर्शियन आखातातील आपल्या नौदलाच्या हालचाली वाढविल्या आहेत. होर्मुझच्या आखातातील आपल्या बेटांवर इराणने विमानभेदी यंत्रणा तैनात केली आहे. यामुळे या सागरी क्षेत्रातील तणाव वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अरब मित्रदेशांना शस्त्रसज्ज करण्याची भूमिका ट्रम्प प्रशासनाने स्वीकारली आहे.

सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात (युएई) यांना शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि अमेरिकन काँग्रेसने टीका केली आहे. बायडेन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर सौदी, युएईसाठीचे शस्त्रसहाय्य मागे घेण्याबाबत निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. येमेनमधील संघर्षात या दोन्ही देशांनी युद्धगुन्हे केल्याचा ठपका बायडेन यांनी ठेवला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणरोबर नव्याने अणुकरार देखील करणार आहेत. पण बायडेन यांनी इराणसोबत असा करार करण्याआधी अरब देशांना विश्‍वासात घ्यावे, असा इशारा सौदीने काही दिवसांपूर्वी दिला होता.

leave a reply