अमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’चे हेरातमधील तालिबानच्या तळांवर हवाईहल्ले

वॉशिंग्टन/काबुल – अमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’ने अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील तालिबानच्या तळांवर हल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी चढविण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधून माघार घेणार्‍या अमेरिकेने तालिबानवर हवाईहल्ले करण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या हवाईहल्ल्यातून अमेरिकेने तालिबानला स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जाते.

अमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’चे हेरातमधील तालिबानच्या तळांवर हवाईहल्लेगेल्या आठवड्यापासून तालिबानने हेरातवर ताबा मिळविण्यासाठी आक्रमक हल्ले सुरू केले होते. शुक्रवारी रात्री तालिबानने हेरातमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावरही हल्ला चढविला होता. हेरातमधील गुझारा व गुलरानमध्येही तालिबानकडून हल्ले करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’ने हेरातमधील तालिबानच्या तळावर चढविलेला हल्ला महत्त्वाचा मानला जातो.

तालिबानच्या सिआवोशानमधील तळांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. हेरातमधील तालिबानचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अमेरिकी बॉम्बर हल्ले चढवित असतानाच, अफगाणी लष्करानेही तालिबानविरोधात मोहीम सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हेरात हा प्रांत इराण सीमेला जोडलेला असून, त्यावरील ताबा अफगाणिस्तान व इराणमधील संपर्क तोडणारा ठरु शकतो.अमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’चे हेरातमधील तालिबानच्या तळांवर हवाईहल्ले

अमेरिकी ‘बी-52 बॉम्बर’ने हेरातवर चढविलेले हवाईहल्ले आठवड्यातील दुसरी मोठी हवाई कारवाई ठरली आहे. गेल्या शुक्रवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कंदहार व हेल्मंड प्रांतातील तालिबानच्या जागांवर भीषण हल्ले चढविले होते. या हल्ल्यांमध्ये तालिबानला मोठी जीवितहानी सोसावी लागली होती. त्यानंतर तालिबानने अमेरिकेला धमकावलेही होते. मात्र या धमकावणीकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने पुन्हा एकदा तालिबानला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या सेंटकॉमने याबाबत इशाराही दिला होता. तालिबानने आपल्या कारवाया रोखल्या नाहीत, तर अफगाणी लष्कराला सहाय्य करण्यासाठी हवाईहल्ल्यांमध्ये वाढ केली जाईल, असे सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी बजावले होते. काही विश्‍लेषकांनी अमेरिकेच्या ‘बी-52 बॉम्बर’ने चढविलेल्या हल्ल्यांची तुलना 2001 साली अमेरिकेने केलेल्या कारवाईशी केली आहे. 2001 साली अमेरिकी बॉम्बर्सनी चढविलेले हल्ले तालिबानची राजवट उलथण्यासाठी निर्णायक घटक ठरला होता, असे सांगण्यात येते.

leave a reply