ऑस्ट्रेलिया-चीन वादात अमेरिकेचे ऑस्ट्रेलियाला समर्थन

वॉशिंग्टन/कॅनबेरा – ‘कोरोनाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चीनने आर्थिक परिणामांची धमकी दिली. हे योग्य नसून याप्रकरणी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ऑस्ट्रेलिया-चीन वादात अमेरिका ऑस्ट्रेलियाबरोबर असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, चीनबरोबर सुरु असलेल्या राजनैतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने भारताशी सहकार्य वाढविण्याचे संकेत दिले असून पुढील महिन्यात दोन देशांच्या पंतप्रधानांमध्ये महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाने कोरोना साथीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. साथीचे मूळ व इतर बाबींची ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’कडून चौकशी करण्याची मागणी ऑस्ट्रेलियाने केली होती. ‘डब्ल्यूएचओ’मध्ये यासाठी ठराव सादर करण्यासाठीही ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेतला. ऑस्ट्रेलियाच्या या हालचालींवर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली होती.

ऑस्ट्रेलियाने ‘डब्ल्यूएचओ’मध्ये ठराव मांडल्यास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल, असे चीनकडून धमकावण्यात आले होते. मात्र चीनकडे दुर्लक्ष करून ऑस्ट्रेलिया आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे संतापलेल्या चीनने ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर थेट ८० टक्के कर लादण्याची घोषणा केली.

चीनच्या या कारवाईला प्रत्त्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने थेट जागतिक व्यापार संघटनेत जाण्याचा इशारा दिला. याप्रकरणी अमेरिका ऑस्ट्रेलियाबरोबर असल्याचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांनीही या मुद्यावर साथ द्यावी यासाठी ऑस्ट्रेलियाने हालचाली सुरू केल्या आहेत.

चीनने उत्पादनांवर कर लादल्यानंतर भारत व ऑस्ट्रेलिया सहकार्याचे वृत्त समोर येणे महत्त्वाचे ठरते. यापूर्वी अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘क्वाड’ गटाअंतर्गत ऑस्ट्रेलिया व भारतात सहकार्य वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनच्या आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेने हा गट उभारला असून त्यात अमेरिकेसह भारत, ऑस्ट्रेलिया व जपानचा समावेश आहे. त्यामुळे चीनच्या मुद्यावर ऑस्ट्रेलिया व भारताची भूमिका समान असून सहकार्य वाढविण्यासाठी हाच घटक महत्वाचा ठरेल, असे संकेत आता मिळत आहेत.

चीनने ऑस्ट्रेलियाला धमकवल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियन उत्पादने खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकरणात ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला आहे. त्यापूर्वी कोरोना साथीच्या मुद्यावरही ऑस्ट्रेलिया व भारतात बोलणी झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी भारतातील निर्यातीसंदर्भात असलेले काही अडथळेही ऑस्ट्रेलियाने हटवले आहेत.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता पुढील काळात चिनी आक्रमकता व दादागिरीचा मुद्दा भारत व ऑस्ट्रेलियाला अधिक जवळ आणण्यात महत्त्वाचा ठरू शकतो. यासाठीं अमेरिकाही पुढाकार घेऊ शकते, असे संकेतही मिळत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मध्य व दक्षिण आशियासाठीच्या उपमंत्री एलिस वेल्स यांनी, भारताला बाजारपेठेशी निगडित धोरण अधिक सुलभ व सहज करण्याची सूचना केली. यात कोरोना साथीचा संदर्भ देऊन फक्त अमेरिकाच नाही तर युरोप व ऑस्ट्रेलियाबरोबरील संबंध सुधारण्यावर लक्ष द्या, असे वक्तव्य वेल्स यांनी केले. यातील ऑस्ट्रेलियाचा उल्लेख महत्त्वाचा असून कोरोनाचा संदर्भ चीनकडे निर्देश करणारा ठरतो.

leave a reply