राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये टोळधाड

उज्जैन – कोरोनाच्या संकटाशी सारा देश लढत असतानाच पश्चिम बंगाल आणि ओडिशाला चक्रीवादळाचा फटका बसला. त्यानंतर आता मध्य प्रदेशवर आणि राजस्थानमध्ये नैसर्गिक आप्पती कोसळली आहे. राजस्थानच्या १६ आणि मध्य प्रदेशच्या १५ जिल्ह्यांमध्ये ‘वाळवंट टोळधाडी’ने आक्रमण केले आहे. यामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मागील काही वर्षातील ही सर्वात मोठी टोळधाड असल्याचे सांगण्यात येते. या टोलझुंडी पाकिस्तानातून राजस्थानात आणि तेथून मध्य प्रदेशात दाखल झाल्याचे सांगण्यात येते. पंजाब, हरियाणामध्येही या टोळझुंडीने प्रवेश केला असून उत्तरप्रदेश आणि दिल्लीतही टोळधाडी दाखल होण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमधील दोन लाख हेक्टरवरील कापूस आणि भाजी पिकांचे नुकसान केले आहे.

राजस्थानातील ३३ पैकी १६ जिह्यांमधे टोळधाडीनी पिकाचे नुकसान केले आहे. तसेच मध्य प्रदेशमधील उज्जैन, मंदसौर, नीमच, अगर-मालवा आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या टोळधाडींचा मोठा फटका बसला. टोळधाडींमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र या नुकसानीचा पूर्ण अंदाज अद्याप बांधता आलेला नाही.

फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये टोळधाडीनी बऱ्याच ठिकाणी आक्रमण केले होते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. टोळधाडीमुळे पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. तर पाकिस्तानने भारताकडे मदतीचा हात मागितला होता. साधारण जून, जुलै महिन्यात पाकिस्तानातून वाळवंट टोळ मोठ्या संख्येने राजस्थानात येतात. मात्र यावर्षी या टोळझुंडी एप्रिल महिन्यातच राजस्थानात दाखल होण्यास सुरुवात झाली. राजस्थान आणि मध्यप्रदेश ही राज्ये या आपत्तीचा सामना करीत आहेत. तसेच या राज्यांनी या आपत्तीचा सामना करण्याकरिता केंद्र सरकारकडेही सहाय्य मागितले आहे.

leave a reply