2022-23च्या वित्तीय वर्षात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला

नवी दिल्ली – 2022-23च्या वित्तीय वर्षात अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश ठरला. या वित्तीय वर्षात दोन्ही देशांमधील व्यापार तब्बल 128.55 अब्ज डॉलर्सवर गेला. आधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यात 7.65 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या वित्तीय वर्षात चीन हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश ठरला. चीनबरोबरील व्यापारातील भारताची तूट तब्बल 83 अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेलेली आहे. मात्र भारताचा अमेरिकेबरोबरील व्यापार पुढच्या काळात असाच वाढत राहिल, असा विश्वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तर सध्याच्या काळात भारत चीनमधून अधिक प्रमाणात आयात करीत असला तरी दोन्ही देशांचे संबंध व भारताचे धोरण लक्षात घेता, चीनबरोबरील व्यापाराला फार मोठे भवितव्य नसल्याचे दिसत आहे.

2022-23च्या वित्तीय वर्षात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलाअमेरिकेबरोबरील भारताचा व्यापार 2022-23 च्या वित्तीय वर्षात तब्बल 128.55 अब्ज डॉलर्सवर गेला असून यात भारताच्या सुमारे 78.31 अब्ज डॉलर्स इतक्या निर्यातीचा समावेश आहे. आधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यात 2.81 टक्क्यांची वाढ झालेली आहे. तर याच वित्तीय वर्षात अमेरिकेने भारताला 50.24 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. आधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत अमेरिकेने भारताला केलेल्या निर्यातीत तब्बल 16 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.

पुढच्या काळात दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ‘फेडरेशन्स ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स’चे (एफआयईओ) अध्यक्ष ए. सख्तीवेल यांनी भारत अमेरिकेला फार्मास्युटिकल्स, इंजिनिअरिंग, हिरे आणि आभूषणांची निर्यात करीत असल्याची माहिती देऊन यात वाढ झाल्याचे म्हटले आहे. येत्या महिन्यांमध्ये अमेरिकेला केल्या जाणाऱ्या निर्यातीचा कल असाच वाढता राहिल, असा विश्वास सख्तीवेल यांनी व्यक्त केला.

अमेरिका हा भारताशी सर्वाधिक व्यापार करणारा देश बनलेला असताना, चीन हा भारताशी व्यापार करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारत व चीनचा 2022-23 च्या वित्तीय वर्षातील व्यापार 113.83 अब्ज डॉलर्सवर गेला. आधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यात दीड टक्क्याची घट झाली आहे. त्याचवेळी भारताला या व्यापारात 83.2 अब्ज डॉलर्स इतकी तूट सहन करावी लागली. भारताची चीनमधील निर्यात अवघी 15.32 अब्ज डॉलर्स इतकी होती. 2022-23च्या वित्तीय वर्षात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलाआधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यात 28 टक्क्यांची घट झाली. त्याचवेळी चीन भारताला करीत असलेल्या निर्यातीत 4.16 टक्के इतकी वाढ होऊन ही निर्यात 98.58 अब्ज डॉलर्सवर गेली.

कच्चा माल तसेच इतर अनेक गोष्टींसाठी भारताला अजूनही चीनवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे भारताच्या उत्पादनाला चालना मिळाल्यानंतर, चीनमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल भारतीय उद्योगक्षेत्राला आयात करावा लागल्याचे दावे केले जातात. यामुळे चीनमधून भारतात येणाऱ्या निर्यातीत वाढ झाली. पण सरकारने स्वीकारलेल्या आत्मनिर्भरतेच्या धोरणामुळे पुढच्या काळात भारताला कच्चा माल तसेच इतर गोष्टींसाठी चीनवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्याचा परिणाम चीनबरोबरील द्विपक्षीय व्यापारावर दिसू शकेल. आपले उत्पादन क्षेत्र विकसित करून चीनवरील अवलंबित्त्व कमी करण्यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्नांची जगभरात दखल घेतली आहे.

दरम्यान, चीनला मागे टाकून अमेरिका भारताचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश बनला, ही बाब भविष्याचे संकेत देणारी ठरते. भारत व अमेरिकेमधील व्यापार प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. त्यासाठी दोन्ही देशांनी अधिक प्रयत्न करायला हवे, असा दावा उभय देशांमधील अर्थतज्ज्ञ करीत आहेत. हा द्विपक्षीय व्यापार सुमारे 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय भारत व अमेरिकेच्या नेतृत्त्वाने आपल्यासमोर ठेवले होते. मात्र अजूनही द्विपक्षीय व्यापारातील वाद सोडविण्यात भारत व अमेरिकेला यश मिळालेले नाही. यावर वाटाघाटी सुरू असून हा अडथळा दूर करण्यात उभय देशांना यश मिळालेच, तर द्विपक्षीय व्यापाराची स्थितीगती बदलू शकते, असे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत.

हिंदी

 

leave a reply