अमेरिका व चीनची अर्थव्यवस्था मंदावण्याचा धोका

- गुंतवणूकदार कॅथी वूड यांचा इशारा

कॅथी वूडवॉशिंग्टन/बीजिंग – येत्या तीन ते सहा महिन्यात अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याचा धोका असून चीनच्या अर्थव्यवस्थेलाही घसरणीचा फटका बसू शकतो, असा इशारा अमेरिकेतील आघाडीच्या गुंतवणूकदार कॅथी वूड यांनी दिला आहे. तर ब्रिटीश गुंतवणूकदार जेरेमी ग्रँथम यांनी अमेरिकेतील शेअरबाजार सध्या ‘सुपरबबल’च्या अंतिम टप्प्यात असून येणार्‍या काही महिन्यात शेअरबाजाराला तब्बल ३५ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसेल, असे बजावले आहे.

अमेरिकेसह जगातील प्रमुख देशांवर अद्यापही कोरोना साथीचे सावट कायम आहे. बहुतांश देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लॉकडाऊन व इतर निर्बंध कायम असून त्याचा परिणाम उत्पादन तसेच पुरवठ्यावर होताना दिसत आहे. जास्त मागणी व कमी पुरवठा यामुळे वस्तूंच्या किंमती वाढत असून अनेक देशांमध्ये महागाई निर्देशांक उच्चांकी स्तरावर जाऊन पोहोचला आहे. इंधनाच्या दरांमध्येही वाढ होण्यास सुरुवात झाली असून नजिकच्या काळात इंधनाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाण्याचे भाकितही वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका तसेच ब्रिटनमधील आघाडीच्या गुंतवणूकदारांनी दिलेले इशारे लक्ष वेधून घेणारे ठरतात.

कॅथी वूड या अमेरिकेतील ‘आर्क इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट एलएलसी’ या कंपनीच्या संस्थापक आहेत. तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमधील गुंतवणूक हे या कंपनीचे वैशिष्ट्य मानले जाते. वूड यांनी कंपनीच्या तिमाही अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेतील संभाव्य उलथापालथीबाबत बजावले आहे. अमेरिकेच्या लघु व दीर्घकालिन ‘ट्रेझरी नोट्स’चा व्याजदर तसेच परतावा दाखविणारी ‘यिल्ड कर्व्ह’ सपाट होत असून ही बाब अमेरिकेतील संभाव्य मंदीचे संकेत असल्याचा दावा कॅथी वूड यांनी केला.

कॅथी वूडजगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील संकटाकडेही वूड यांनी लक्ष वेधले. या संकटामुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावू शकते, असा इशारा ‘आर्क इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट एलएलसी’च्या संस्थापकांनी दिला. चीनबरोबरच जगातील इतर उगवत्या अर्थव्यवस्थांनाही आर्थिक घसरणीचा फटका बसेल, असा दावा वूड यांनी केला.

वूड यांच्यापाठोपाठ ब्रिटनमधील आघाडीचे गुंतवणूकदार जेरेमी ग्रँथम यांनी अमेरिकेतील शेअरबाजार कोसळण्याचा इशारा दिला आहे. गेली काही वर्षे अमेरिकेचे शेअरमार्केट ‘सुपरबबल’मध्ये असून हा बबल आता फुटण्याच्या बेतात आहे, असे ग्रँथम यांनी बजावले. अमेरिकेसह इतर शेअरबाजारांमागील तेजीमागे ‘फेडरल रिझर्व्ह’ व इतर मध्यवर्ती बँकांनी व्याजदराबाबत अवलंबिलेले धोरण कारणीभूत होते, असा दावाही त्यांनी केला.

मात्र येत्या काही दिवसात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याचे संकेत मिळाले असून त्याचे पडसाद शेअरबाजारात उमटतील, असे जेरेमी ग्रँथम यांनी म्हटले आहे. शेअरबाजार कोसळल्यास जवळपास ३५ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

leave a reply