अमेरिकेत कोरोनाच्या साथीमुळे दरदिवशी दोन हजाराहून अधिक जणांचा बळी

दोन हजाराहून अधिकवॉशिंग्टन – अमेरिकेतील कोरोनाच्या साथीची तीव्रता वाढली असून दिवसाला सरासरी दोन हजारांहून अधिक जणांचा बळी जात आहे. सलग चौथ्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक दगावत असून शुक्रवारी ३,५६४ जणांचा बळी गेला. तर गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाचे ८,७९,८७७ रुग्ण आढळले आहेत. ‘जॉन हॉप्किन्स युुनिव्हर्सिटी’ने आपल्या नव्या माहितीत म्हटले आहे.

दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही अमेरिकेतील कोरोनाच्या साथीची तीव्रता अद्याप कायम आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिका व युरोपिय देशांमधील कोरोना तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती. अमेरिकेच्या यंत्रणांनी याबाबत इशारा प्रसिद्ध केला होता. पण तीन आठवड्यानंतरही अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांची व या साथीमुळे बळी जाणार्‍यांची संख्या भयावहरित्या वाढत आहे.

सलग चार दिवस सरासरी दोन हजारांहून अधिक जणांचा बळी जात असून अमेरिकेत प्रत्येक मिनिटाला एक जण या साथीने दगावत असल्याची नोंद आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. ही अतिशय भयावह बाब असल्याची चिंता वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अधिकारी व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राला व अर्थव्यवस्थेला फटका बसेल, असे संकेत काही दिवसांपूर्वीच अमेरिकी माध्यमांनी दिले होते.

साधारण तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीने गंभीर इशारा दिला होता. येत्या काळात अमेरिकेत दर आठवड्याला आढळणार्‍या रुग्णांची संख्या २५ लाखांपर्यंत जाईल, असे म्हटले होते. गेल्या चार दिवसांमध्ये कोरोनाने दगावणार्‍यांची वाढती संख्या पाहिल्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीचा इशारा प्रत्यक्षात उतरणार असल्याची भीती व्यक्त केली जातेे.
कोरोनाचा नवा स्ट्रेन असणार्‍या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’मुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून या व्हेरिअंटच्या फैलावाला सुरुवात झाल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, शनिवारी जपानमध्येही कोरोनाच्या दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जपानच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असून चीनने राजधानी बीजिंगच्या आसपासच्या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू केले आहे.

leave a reply