तैवानवरून अमेरिका-चीन युद्ध भडकण्याचा धोका

- विश्लेषकांचा दावा

Taiwan-China-Americaवॉशिंग्टन/बीजिंग/तैपेई – चीनकडून तैवानच्या हद्दीत वाढती घुसखोरी, तैवानभोवती होणारे चिनी युद्धसराव, चिनी नेतृत्वाच्या धमक्या आणि तैवानला अमेरिकेकडून मिळणारे पाठबळ; यामुळे तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका व चीनमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता बळावली आहे. गेल्या काही आठवड्यात घडलेल्या घटनांचा दाखला देऊन विश्लेषक व माध्यमे या युद्धाचा धोका वाढल्याचे इशारे देत आहेत.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट साऊथ चायना सी तसेच इस्ट चायना सी या क्षेत्रातील काही भागांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करेल असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात दिला होता. हा इशारा देण्यापूर्वी तसेच त्यानंतरच्या काळात चीनकडून तैवानविरोधातील हालचाली जास्तच वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये झालेल्या एका विशेष बैठकीत कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तैवानवर हल्ला चढवण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची आग्रही भूमिका मांडली होती.

याच बैठकीत, चीनचे वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांनी यापुढे तैवानबरोबर शांततामय मार्गाने एकत्रीकरण शक्य नसल्याचे बजावले होते. त्साई इंग-वेन यांची तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेली फेरनिवड हा त्यामागील प्रमुख घटक असून त्यामुळे चीनचा तैवानविरोधातील पवित्रा अधिक आक्रमक होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. अमेरिकी विश्लेषक मायकल मेझ्झा यांनीही याकडे लक्ष वेधले.

Taiwan-China-Americaगेल्या काही महिन्यात चीनच्या मासेमारी तसेच वाळूचा उपसा करणार्‍या शेकडो बोटी तैवानच्या सागरी हद्दीनजीक बिनधास्तपणे वावरत आहेत. या बोटी अनेकदा तैवानच्या हद्दीत घुसखोरी करीत असून त्याला चीनचा ‘मेरिटाईम मिलिशिया’ व तटरक्षक दलाचे पाठबळ आहे. तैवानमधील ‘नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी रिसर्च’ या अभ्यासगटाने यासंदर्भात अहवालही प्रसिद्ध केला आहे. काही निरीक्षकांनी याचा उल्लेख ‘ग्रे झोन टॅक्टिक्स’ असा केला आहे. प्रत्यक्ष संघर्ष न करता तैवानच्या संरक्षणक्षमता जोखून संरक्षण दलांना जेरीस आणण्याचा उद्देश यामागे आहे.

चीनच्या लढाऊ विमानांकडून गेल्या दोन आठवड्यात तब्बल सातवेळा तैवानच्या हवाईहद्दीत करण्यात आलेली घुसखोरी हीदेखील याच धोरणाचा भाग असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनच्या या वाढत्या कारवाया फक्त तैवानलाच नाही तर त्याच्यामागे ठामपणे उभे राहणार्‍या अमेरिकेलाही ‘वॉर्निंग’ असल्याचा दावा लष्करी विश्लेषकांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबाबत स्वीकारलेले धोरण यासाठी कारणीभूत आहे असा दावा चीनकडून करण्यात येत आहे.

तीन दशकांनंतर प्रथमच अमेरिकेने तैवानला लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी तैवानने अमेरिकेकडून हार्पून क्षेपणास्त्र खरेदी करण्याचीही तयारी केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तैवानला देण्यात येणारे संरक्षण सहाय्यही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या साऊथ चायना सी क्षेत्रातील वाढत्या संरक्षण तैनातीकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.

Taiwan-China-Americaगेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ अमेरिकेच्या विनाशिका, लढाऊ विमाने, टेहळणी विमाने, बॉम्बर्स व ड्रोन्स सातत्याने साउथ चायना सी क्षेत्रात गस्त घालीत आहेत. तीन वर्षानंतर प्रथमच अमेरिकेने आपल्या तीन विमानवाहू युद्धनौका एकाच वेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात धाडल्या आहेत. त्यातील दोन विमानवाहू युद्धनौकांनी नुकताच तैवाननजीकच्या सागरी क्षेत्रात युद्धसराव केल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेतील अभ्यासगट ‘इन्स्टिट्यूट ऑफ तैवानीज स्टडीज’चे प्रमुख केनेथ वांग यांनी, तैवानमध्ये अमेरिकेने कायमस्वरूपी तळ उभारावा, असा सल्ला दिला आहे. तर अमेरिकेतील संसद सदस्य माइक गॅलघर यांनी, अमेरिका आता जर तैवानच्या पाठीशी ठाम उभी राहिली नाही तर चीन तैवानचा घास गिळेल, असे बजावले आहे. ही सर्व पार्श्वभूमी लवकरच तैवानच्या मुद्यावर अमेरिका व चीनमध्ये प्रत्यक्ष संघर्ष भडकू शकेल, असे संकेत देणारी दिसत आहे.

leave a reply