अमेरिकेच्या सीआयएचे प्रमुख लिबियाच्या आकस्मिक भेटीवर

सीआयएचे प्रमुखत्रिपोली – अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी लिबियाला आकस्मिक भेट दिली. यावेळी बर्न्स यांनी लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद देईबा यांच्याशी चर्चा केली. देईबा हे लिबियातील तुर्कीसमर्थक व रशियाविरोधी गटाचे नेते म्हणून ओळखले जातात. सध्या युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बर्न्स यांचा हा लिबिया दौरा महत्त्वाचा ठरतो.

लिबिया हा इंधनसंपन्न व ‘ओपेक’चा सदस्य देश आहे. लिबियातील देईबा व सहकारी गटांना अमेरिका आणि युरोपातील काही देशांचे समर्थन आहे. 2019 सालानंतर लिबियामध्ये भडकलेल्या गृहयुद्धात अमेरिका व नाटोने देईबा यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लिबियाला भेट देणे अपेक्षित होते. पण आपल्या अधिकाऱ्यांच्या भेटीबाबत गोपनीयता राखणाऱ्या अमेरिकेने सीआयए प्रमुखांची भेट जगजाहीर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते.

याच लिबिया दौऱ्यात बर्न्स पूर्व लिबियातील बंडखोर नेते जनरल खलिफा हफ्तार यांचीही भेट घेणार आहेत. हफ्तार यांना रशिया, युएई या देशांचे समर्थन होते. त्यामुळे या लिबिया दौऱ्यातून सीआयएचे प्रमुख वेगळेच संकेत देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply