चीन सोडणाऱ्या अमेरिकी कंपन्या उत्तर प्रदेशात येण्यासाठी उत्सुक

- उत्तर प्रदेशचे लघु व मध्यम उदयॊगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह

नवी दिल्ली – चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकी कंपन्या भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. तसेच अमेरिकन सरकारही यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतात काम करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली होती. यामध्ये चीनला पर्याय ठरू शकणाऱ्या भारतात गुंतवणुकीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधून आपला उद्योग हलविण्याच्या तयारीत असलेल्या १०० अमेरिकी कंपन्यांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याची उत्सुकता दाखविल्याचे उत्तर प्रदेशचे लघु व मध्यम उदयॊगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी म्हटले आहे. यामध्ये अमेरिकी कंपन्यांमध्ये संरक्षण, औषध आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

गेल्या आठवड्यात चीनमधून आपले कारखाने हलविण्याच्‍या तयारित असलेल्या हजार कंपन्या भारत सरकारबरोबर विविध पातळ्यांवर चर्चा करीत असल्याची बातमी समोर आली होती. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियन कंपन्या यासंदर्भांत भारताशी चर्चा करीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी चीन आणि उर्वरित जगामध्ये रुंदावणारी दरी भारतासाठी सुसंधी असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरील चर्चेत राज्यांना परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित रण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले होते. व्यापार युद्ध आणि त्यानंतर कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चीन सोडणाऱ्या बहुराष्ट्र कंपन्यांसाठी आपली दारे खुली ठेवा असा संदेश यावेळी पंतप्रधांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर चीनला पर्याय म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्या भारताला वळत आहेत, हे अधोरेखित करणाऱ्या आणखी दोन बातम्या बुधवारी समोर आल्या आहेत. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतात काम करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. ‘अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया’च्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या चीनमध्ये होत असलेल्या औद्योगिक हालचाली लवकरच भारतात सुरु होतील, अशी शक्यता यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे दक्षिण आशियासाठीचे उपमंत्री थॉमस वाजदा यांनी वर्तवली. तसेच अमेरिकी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपला प्रस्ताव घेऊन भारत सरकारकडे जावे आणि सवलती व सुविधांची मागणी करावी. यामुळे अमेरिकी कंपन्यांना आपला व्यवसायाचा विस्तार करणे सोपे जाईल, असा सल्ला यावेळी उपमंत्री वाजदा यांनी अमेरिकी कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिला असल्याची बातमी आहे.

‘युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ने अमेरिकी कंपन्या, गुंतवणूकदारांसाठी एका ‘वेबिनार’चे आयोजन केले होते. यामध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी चर्चा केल्यावर १०० कंपन्यांनी उत्तरप्रदेशात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा राज्याचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी केला. उत्तरप्रदेशात मोठ्या प्रमाणावर ग्राहक असून मनुष्यबळ आणि अनुकूल वातावरण असल्याने या कंपन्या उत्तरप्रदेशाला पसंती देत असल्याचे सिंह म्हणाले.

दरम्यान,केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ने विशेष समिती बनवली असून भारतात परदेशी गुंतवणूक खेचण्याकरिता आणि प्रोत्साहन देण्याकरिता धोरण तयार करण्याचे काम या समितीकडून सुरु असल्याचे सांगितले जाते.

leave a reply