कोरोनाच्या साथीसाठी अमेरिकी कंपनीचा चीनविरोधात सहा ट्रिलियन डॉलर्सचा दावा

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसच्या साथीची माहिती लपवून अमेरिकेसह जगाची फसवणूक केल्याचा आरोप करून अमेरिकी कंपनीने चीनविरोधात तब्बल सहा ट्रिलियन डॉलर्सचा दावा ठोकला आहे. कोरोनाच्या साथीवरून चीनकडे नुकसानभरपाईची मागणी करणारा हा सहावा दावा ठरला आहे. यापूर्वी इस्रायल तसेच जर्मनीनेही चीनकडे अशाच प्रकारे भरपाईची मागणी केली आहे.

अमेरिकेतील ‘बर्मन लॉ ग्रुप’ या कायदेविषयक सेवा पुरवणाऱ्या कंपनीने चीनविरोधात दावा दाखल केला आहे. ‘चीनने जे काही केले त्यासाठी त्यांना जबाबदार धरायलाच हवे’, अशा शब्दात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जेरेमी अलटर्स यांनी दाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. अमेरिकी कंपनीच्या या दाव्याला १० हजारांहून अधिक जणांनी समर्थन दिले आहे. त्यात कोरोनाच्या साथीमुळे मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाची साथ आल्यानंतर चीनने त्याची माहिती लपवली. आपल्या नागरिकांसाठी उपाययोजना करीत असतानाच चीनने सदर साथ जगभरात फैलावू दिली, असा ठपका अमेरिकी कंपनीच्या दाव्यात ठेवण्यात आला आहे. या दाव्यापूर्वीं अमेरिकेतील कॅलिफोर्निया व फ्लोरिडा राज्यांत तसेच ‘फ्रीडम वॉच’ या गटाकडून कायदेशीर दावे दाखल करण्यात आले आहेत.

अमेरिकेव्यतिरिक्त इस्रायल तसेच जर्मनीतूनही चीनविरोधात नुकसानभरपाईचे दावे करण्यात आले आहेत. इस्रायलच्या ‘शुरात हदीन’ या स्वयंसेवी गटाने चीनविरोधात भरपाईचा दावा दाखल करण्याची तयारी केली आहे. जर्मनीतील आघाडीचे दैनिक ‘बिल्ड’च्या संपादकांकडूनही १६५ अब्ज डॉलरच्या भरपाईची मागणी करण्यात आली आहे. ब्रिटन, जपान व ऑस्ट्रेलियाकडूनही चीनविरोधात कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनकडून कोरोनव्हायरसच्या साथीसाठी जबर नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता.

leave a reply