अमेरिका, युरोप व जपानकडून रशियावर निर्बंधांची घोषणा

निर्बंधांची घोषणावॉशिंग्टन/ब्रुसेल्स – रशियाने दोन नव्या देशांना दिलेल्या मान्यतेनंतर पाश्‍चात्य देशांसह जपानने कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख बँकांसह त्यांचे सहकारी उपक्रम तसेच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या तीन निकटवर्तियांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. त्याचवेळी रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून कर्ज उभारण्यास बंदी घालण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

युरोपिय महासंघाने रशियन संसदेच्या ३५० संसद सदस्यांवर निर्बंध लादत असल्याची घोषणा केली आहे. निर्बंधांच्या यादीत २७ रशियन उद्योजक व कंपन्यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे. जपानने रशियन कर्जरोख्यांच्या व्यवहारांवर बंदी जाहीर केली आहे. त्याचवेळी काही रशियन उद्योजकांची मालमत्ता गोठविण्यात आली असून त्यांच्यावर प्रवेशबंदीही लागू करण्यात येत असल्याचे जपान सरकारने सांगितले. अमेरिका व युरोपने पुढील काळात रशियाविरोधात अधिक आक्रमक निर्बंध जाहीर करण्यात येतील, असे संकेतही दिले आहेत.

leave a reply