भारत-फ्रान्स सहकार्यावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होणार नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

भारत-फ्रान्सनवी दिल्ली – ‘भारत आणि फ्रान्सचे सहकार्य सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी आणि बदलांच्या प्रभावापासून अलिप्त आहेत. याचा दोन्ही देशांच्या सहकार्यावर परिणाम झालेला नाही. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही भारत फ्रान्सकडे विश्‍वासार्ह मित्रदेश म्हणून पाहतो’, अशा शब्दात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही देशांचे सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. याबरोबरच युक्रेनची समस्या सोडविण्यासाठी भारत-फ्रान्स राजनैतिक स्तरावर प्रयत्न करीत असल्याचे पररष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे..

फ्रान्सच्या एका अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन्ही देशांच्या सहकार्यावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. भारत व फ्रान्समधील रफायल विमानांचा करार पूर्ण होत आहे, ही बाब दोन्ही देशांचे सहकार्य दृढ करणारी ठरते, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत भारत व फ्रान्सचे धोरण एकसमान असल्याची जाणीव जयशंकर यांनी करून दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांनी कुणाच्या वर्चस्ववादी धोरणाचे शिकार होऊ नये किंवा महासत्तांच्या संघर्षाचाही भाग बनता कामा नये, असे भारत व फ्रान्सचे धोरण आहे. यामुळे सदर क्षेत्रातील देशांना उत्तम पर्याय मिळेल, असा विश्‍वास भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वर्चस्ववादी कारवाया सुरू असून यापासून या क्षेत्रातील देशांचे सार्वभौमत्त्व धोक्यात आले आहे. चीनचा धोका टाळायचा असेल, तर अमेरिकेशी हातमिळवणी करण्यावाचून पर्याय नाही, असा समज अमेरिका पसरवित आहे. अशा परिस्थितीत भारत व फ्रान्सशी सहकार्य करून आपले सार्वभौमत्त्व अबाधित राखण्याचा पर्याय दोन्ही देशांच्या आघाडीने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांसमोर ठेवला आहे. हा संदेश परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यावेळी दिला.

दरम्यान, युक्रेनच्या समस्येवर बोलताना जयशंकर यांनी या समस्येचे मूळ सोव्हिएत रशियाच्या काळातील राजकारणात असल्याचा दावा केला.

नाटोचा विस्तार तसेच रशिया व युरोपिय देशांचे संबंध याच्याशी युक्रेनची समस्या जोडलेली आहे, असे सांगून जयशंकर यांनी भारत व फ्रान्स ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली.

राजनैतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स युक्रेनची समस्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या चौकटीत सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण इथला तणाव कमी करायचा असेल तर दोन्ही बाजूंनी आक्रमकता टाळायलाच हवी, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

आक्रमक पवित्रा कायम ठेवून ही समस्या सुटणार नाही. तसेच राजनैतिक स्तरावरील वाटाघाटींखेरीज ही समस्या सोडविण्यासाठी दुसरा पर्याय असू शकत नाही, ही भारताची भूमिका जयशंकर यांनी यावेळी पुन्हा एकदा मांडली.

फ्रान्सच्या अभ्यासगटाला संबोधित करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शीतयुद्धाच्या काळातील मानसिकतेवर टीका केल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने रशियाबाबत स्वीकारलेल्या भूमिकेशी फ्रान्स देखील सहमत नाही. रशियाबरोबर वाटाघाटी करून युक्रेनची समस्या सोडविता येईल, असे फ्रान्सचे म्हणणे आहे. त्यामुळे युक्रेनच्या प्रश्‍नावर भारत व फ्रान्सची भूमिका एकसमान असल्याचे दिसते.

leave a reply