मालीतील रशियन कंत्राटी जवानांच्या तैनातीवरून अमेरिका व युरोपचा इशारा

कंत्राटी जवानबमाको/मॉस्को/वॉशिंग्टन – आफ्रिकेतील मालीच्या सरकारने रशियाच्या ‘वॅग्नर’ कंपनीच्या कंत्राटी जवानांची तैनाती करण्याचे संकेत दिले आहेत. मालीच्या या निर्णयावर अमेरिका व युरोपिय देशांनी आक्षेप घेतला आहे. मात्र मालीने रशियन कंपनीची मदत घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. फ्रान्ससह इतर देश मालीतील लष्करी तैनाती मागे घेत असताना, ‘प्लॅन बी’ वापरण्याचा हक्क मालीला नाही का, असा सवाल मालीच्या सरकारने केला आहे.

मालीसह ‘साहेल रिजन’मधील दहशतवाद कमी करण्यासाठी फ्रान्सने या भागात आपले पाच हजार जवान तैनात केले होते. आफ्रिकी देशांसह ‘ऑपरेशन बर्खाने’ नावाची स्वतंत्र मोहीमही आखली होती. मात्र २०१३ सालापासून सुरू असणार्‍या या मोहिमेला अद्यापही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला सोमलियात ‘आफ्रिकन युनियन’ व अमेरिकेकडून दहशतवादाविरोधात मोहीम सुरू आहे. पण ड्रोन हल्ले व मोठ्या कारवायांनंतरही दहशतवादी संघटना अधिक प्रबळ होत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर फ्रान्स तसेच अमेरिकेने या भागातील आपली लष्करी तैनाती कमी करण्याचा निर्णय घेतला.

कंत्राटी जवानमालीकडून रशियन खाजगी कंपनीशी कराराची बोलणी करण्यामागे ही पार्श्‍वभूमी आहे. ‘भागीदार देशांनी काही भागातून सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते कदाचित इतर भागांमधूनही निघून जाऊ शकतात. अशा वेळी आम्ही काय करायचे? आम्हाला प्लॅन बी लागू करण्याचा अधिकार नाही का?’, असा थेट सवाल मालीचे पंतप्रधान चोगुल मैगा यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघटनेत केलेल्या भाषणात मैगा यांनी, फ्रान्सने तैनाती कमी करून माली सोडून जाण्याचा एकतर्फी निर्णय घेतला व आमच्याशी चर्चाही केली नाही, असा आरोप पंतप्रधान मैगा यांनी केला आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी माली रशियन कंपनीशी बोलणी करीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘माली सरकारने खाजगी रशियन कंपन्यांबरोबर बोलणी सुरू केली आहेत. कायदेशीर मार्गाने यावर वाटाघाटी सुरू आहेत. रशियन सरकारचा याच्याशी संबंध नाही. बाहेरुन योग्य सहाय्य मिळत नसताना सुरक्षेसाठी आपली क्षमता कमी पडेल, हा विचार करून मालीने हा निर्णय घेतला आहे’, असे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह म्हणाले.

कंत्राटी जवानमात्र माली व वॅग्नरमधील संभाव्य कराराबाबत अमेरिका व फ्रान्ससह युरोपिय देशांनी घेतला. ‘आफ्रिकी देशांमध्ये वाईट प्रभाव पडत असेल, तर आम्ही त्याबाबत चिंतित आहोत. सुरक्षेसाठी बाहेरील शक्तींची मदत घेणे प्रगती व स्थैर्याच्या दृष्टिने योग्य ठरणार नाही’, असे अमेरिकी अधिकार्‍यांनी बजावले आहे. तर फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनीही माली व रशियन कंपनीमधील वाटाघाटींवर चिंता व्यक्त केली. जर्मनीने आपल्या तैनातीबाबत फेरविचार करण्याचा मालीला इशारा दिला आहे. युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेफ बॉरेल यांनीही, रशियन कंपनीचे सहाय्य माली व महासंघातील संबंधांसाठी चांगले ठरणार नाही, असे बजावले आहे.

‘वॅग्नर ग्रुप’ ही रशियातील खाजगी ‘मिलिटरी कंपनी’ असल्याचे सांगण्यात येत असले तरी या कंपनीचे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात येतो. पुतिन यांच्याकडून रशियाचा प्रभाव वाढविण्यासाठी या कंपनीची वापर करण्यात येतो, अशी चर्चा आहे. गेल्या काही वर्षात या कंपनीने आपले कार्यक्षेत्र वेगाने विस्तारण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन, सिरिया व लिबियापाठोपाठ आफ्रिका खंडातील जवळपास १० देशांमध्ये या रशियन कंपनीचे कंत्राटी जवान तैनात असल्याचे सांगितले जाते. यात मोझांबिक, सुदान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशांचा समावेश आहे.

leave a reply