चीनची वाढती आक्रमकता रोखण्यासाठी अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लष्करी व आर्थिक सहकार्य वाढविणार

- अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

आर्थिक सहकार्यजाकार्ता/वॉशिंग्टन – चीनच्या वाढत्या आक्रमक कारवायांविरोधात इंडो-पॅसिफिक क्षेत्रांमध्ये असणारी चिंता वाढत असून, या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका या क्षेत्रातील लष्करी व आर्थिक सहकार्य भक्कम करण्यावर भर देईल, अशी ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिली. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन सात दिवसांच्या आग्नेय आशियाई दौर्‍यावर दाखल झाले आहेत. ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी आग्नेय आशियाचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दौर्‍यात ब्लिंकन इंडोनेशिया, मलेशिया व थायलंड या तीन देशांना भेट देणार आहेत.

सोमवारी उशिरा इंडोनेशियाची राजधानी जाकार्तामध्ये दाखल झालेल्या ब्लिंकन यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी इंडोनेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्री तसेच अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. जाकार्तामधील विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नियमांवर आधारित व्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी अमेरिका आपल्या सहकारी व भागीदार देशांबरोबर काम करेल. प्रत्येक देशाला आपला मार्ग निवडण्याचा हक्क आहे. त्यामुळेच ईशान्येपासून आग्नेय आशियापर्यंत आणि मेकॉंग नदीपासून ते पॅसिफिक बेटांपर्यंत सर्वच जण चीनच्या आक्रमक कारवायांबाबत तीव्र चिंता व्यक्त करीत आहेत. खुल्या सागरी क्षेत्रावर हक्क सांगणे, सरकारी कंपन्यांना अनुदान देऊन बाजारपेठेत उलथापालथ घडविणे, धोरणे मान्य नसणार्‍या देशांची निर्यात बंद करणे व करार नाकारणे यासारखे उद्योग सुरू आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वच देश अशा वर्तनावर नाराज आहेत. अमेरिकेलाही हे पटलेले नाही’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी चीनला फटकारले.

आर्थिक सहकार्यसाऊथ चायना सीमधील चीनच्या वर्चस्ववादी हालचालींमुळे जवळपास तीन ट्रिलियन डॉलर्सहून अधिक रक्कमेच्या व्यापाराला धोका निर्माण झाला आहे, याकडे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. ‘मात्र साऊथ चायना सीमधील दळणवळण मुक्त व खुल्या वातावरणात होईल, यावर अमेरिका ठाम आहे. त्यासाठीच अमेरिकेने तैवान क्षेत्रातील शांतता व स्थैर्य टिकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे’, याची जाणीव ब्लिंकन यांनी यावेळी करून दिली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला असणार्‍या धोक्याचे स्वरुप बदलत आहे त्यामुळे सुरक्षेसंदर्भातील भूमिकेतही बदल करणे गरजेचे असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठीच अमेरिका या क्षेत्रातील आपल्या सहकारी व भागीदार देशांबरोबरील आघाडी अधिक भक्कम करणार असून त्यासाठी लष्करी तसेच आर्थिक सहकार्य वाढविण्यावर भर देईल, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी यावेळी दिली. लष्करी सहकार्य, संरक्षण उद्योग, राजनैतिक सहकार्य, पुरवठा साखळी, गोपनीय माहितीची देवाणघेवाण, तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन यासारखे घटक परस्परांशी जोडण्यात येतील, असा दावा ब्लिंकन यांनी यावेळी केला.

leave a reply