इस्रायली पंतप्रधानांचे स्वागत करून युएईने पॅलेस्टिनींचा विश्‍वासघात केला

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीका

पंतप्रधानांचे स्वागततेहरान – ‘गेल्या ७० वर्षांपासून अरब आणि इस्लामी देशांमधील असुरक्षा, तणाव आणि युद्धाला जबाबदार असणार्‍या बेकायदेशीर देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत करून युएईने पॅलेस्टिनींचा विश्‍वासघात केला आहे. पॅलेस्टिनी जनता तसेच या क्षेत्रातील नागरिक आणि स्वातंत्र्ययोद्धे हे कधीही विसरणार नाहीत’, अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सोमवारी युएईचा दौरा करुन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांची भेट घेतली होती. त्यावर इराणमधून ही प्रतिक्रिया आली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी रविवारी अचानक युएईचा दौरा जाहीर केला. सोमवारी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांच्याशी झालेल्या भेटीत पंतप्रधान बेनेट यांनी चार तास चर्चा केली. यात इस्रायल आणि युएईतील व्यापारी व तंत्रज्ञानविषयक सहकार्याचा मुद्दा होता. त्याचबरोबर युएईने इस्रायलकडे ‘आयर्न डोम’च्या खरेदीबाबत विचारणा केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तर व्हिएन्ना येथे इराणच्या अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटींवरही चर्चा पार पडल्याचे बोलले जाते. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी आपला युएईचा दौरा लक्षणीय ठरल्याचे जाहीर केले.

पंतप्रधानांचे स्वागतइस्रायल व युएईच्या नेत्यांमधील या भेटीवर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. इस्रायलच्या नेत्याची ही भेट या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी केला. इस्रायलबरोबरच्या कुठल्याही सहकार्याला इराणचा ठाम विरोध असल्याचे खातिबझादेह यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जेरूसलेमवरील इस्रायलचा ताबा काढून घेण्यासाठीचा संघर्ष यापुढेही सुरू ठेवण्याची घोषणा खातिबझादेह यांनी केली.

‘जेरूसलेमचा ताबा घेणारा इस्रायल जगभरातील अरब-इस्लामी देशांचा शत्रू आहे. त्यामुळे इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्यास ते पॅलेस्टाईनच्या निर्मितीला हादरा देणारे ठरेल’, अशी टीका खातिबझादेह यांनी केली. इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करणार्‍या युएईचा हा निर्णय पॅलेस्टिनी जनता कधीही विसरणार नसल्याचे खातिबझादेह म्हणाले. दरम्यान, इस्रायलबरोबर अब्राहम करार करणार्‍या युएईला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी इराणने याआधीच दिली होती.

leave a reply