अंतर्गत समस्यांपासून पळ काढण्यासाठी अमेरिका चीनला ‘काल्पनिक शत्रू’ बनवित आहे

- चीनचा अमेरिकेवर आरोप

बीजिंग/वॉशिंग्टन – चीन व अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध ‘कुंठित’ अवस्थेत असून त्यासाठी अमेरिकाच जबाबदार आहे. देशांतर्गत समस्यांपासून लक्ष वळविण्यासाठी अमेरिका चीनला ‘काल्पनिक शत्रू’ म्हणून उभा करीत आहे, असा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेरमन दोन दिवसांच्या चीन दौर्‍यावर असताना झालेल्या बैठकीत चीनने हे आरोप केल्याचे समोर आले आहे. यावेळी अमेरिकेला संबंध सुधारण्याची इच्छा असेल तर, अमेरिकेने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे चीनने बजावल्याचेही सांगण्यात येते.

अंतर्गत समस्यांपासून पळ काढण्यासाठी अमेरिका चीनला ‘काल्पनिक शत्रू’ बनवित आहे - चीनचा अमेरिकेवर आरोपपरराष्ट्र उपमंत्री वेंडी शेरमन व उच्चस्तरिय शिष्टमंडळाने सोमवारी चीनचे परराष्ट्र उपमंत्री शी फेंग व वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत चीनने आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन देशांमधील संबंधांमध्ये अत्यंत गंभीर अडचणी कायम असून त्यासाठी अमेरिकाच कारणीभूत आहे, असा दावा चीनने केला. अमेरिका दडपशाही व जबरदस्तीचे धोरणाचा पुरस्कर्ता असल्याचा ठपकाही चीनच्या मंत्र्यांनी ठेवल्याचे सांगण्यात येते. संबंध सुधारण्यासाठी चीनने अमेरिकेला दोन याद्या सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यातील एका यादीत दोन देशांच्या संबंधांमधील ‘एरर्स’ तर दुसर्‍या यादीत चीनच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या मुद्यांचा समावेश आहे. चीनने अमेरिकेपुढे काही मागण्या ठेवल्याचेही समोर आले आहे. यात हुवेई कंपनीच्या प्रमुख अधिकारी मेंग वान्झोऊ यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील अर्ज मागे घेणे, चिनी अधिकार्‍यांवरील निर्बंध उठविणे व चिनी कंपन्यांना रोखण्याचे धोरण बंद करणे यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी यादीच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र दोन्ही देशांनी परस्परांसाठी महत्त्वाचे व चिंतेचे असणारे मुद्दे उपस्थित केल्याचे म्हंटले आहे.

अंतर्गत समस्यांपासून पळ काढण्यासाठी अमेरिका चीनला ‘काल्पनिक शत्रू’ बनवित आहे - चीनचा अमेरिकेवर आरोपगेल्या काही वर्षात अमेरिका व चीनमधील संबंधांमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. कोरोना, व्यापारी लूट, मानवाधिकारांचे उल्लंघन, हेरगिरी, सायबरहल्ले यासारख्या अनेक मुद्यांवरून अमेरिकेने चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत चीनविरोधात आक्रमक निर्बंध लादण्यासह कारवाई करणारे अनेक निर्णय घेण्यात आले होते. बायडेन प्रशासनाने हे धोरण काही प्रमाणात कायम ठेवले असले तरी त्याचवेळी सामोपचाराने चर्चा करण्याचा मार्गही खुला ठेवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

या वर्षात चीनबरोबरील दुसरी उच्चस्तरीय बैठक याला दुजोरा देणारी ठरते. यापूर्वी मार्च महिन्यात अलास्कामध्ये झालेल्या बैठकीत अमेरिका व चीनच्या नेत्यांमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक उडाल्याचे समोर आले होते.

leave a reply