अफगाणी लष्कराच्या चोवीस तासातील कारवाईत तालिबानचे 125 दहशतवादी ठार

- तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाची चिंता

ब्रुसेल्स/काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानच्या 125 दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये तालिबानच्या वरिष्ठ कमांडर्सचा समावेश असल्याचा दावा केला जातो. गेल्या तीन दिवसात अफगाणी लष्कराने तालिबानविरोधात केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. दोन दिवसांपूर्वी अफगाणी लष्कराच्या हल्ल्यात 262 तालिबानी ठार झाले होते. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने गझनी प्रांतात 43 जणांची भीषण हत्या घडविल्याचे समोर आले आहे.

अफगाणी लष्कराच्या चोवीस तासातील कारवाईत तालिबानचे 125 दहशतवादी ठार - तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाची चिंताअफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अफगाणी लष्कराने 12 प्रांतांमध्ये कारवाई केली. सोमवारी लोगार प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यात 16 दहशतवादी ठार झाले. या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ अफगाणी संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केला. याशिवाय पाकतिया, जोवझान, हेरात, बल्ख आणि इतर प्रांतातील अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

अफगाण सरकारने 34 पैकी 31 प्रांतांमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर तालिबानविरोधी हल्ले तीव्र झाल्याचा दावा केला जातो. अफगाणी लष्कराच्या दोन दिवसांपूर्वीच्या कारवाईत तालिबानच्या 262 दहशतवाद्यांचा खातमा केला होता. तालिबानचे वर्चस्व असलेल्या हेल्मंड, कंदहार, निमरूझ या प्रांतांना लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधांवर हल्ले चढविण्याचे तालिबानचे कट उधळले जात असल्याचे अफगाण सरकारने म्हटले आहे.

भारत आणि अफगाणिस्तानातील मैत्रीचे प्रतिक असलेल्या हेरातमधील सलमा धरणावर हल्ला चढविण्याचा तालिबानने प्रयत्न केला होता. पण अफगाणी लष्कराने हा डाव उधळून लावत तालिबानच्या दहशतवाद्यांना ठार केले. अफगाणी लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी वंशाच्या दहशतवाद्याचा समावेश असल्याचा दावा केला जातो. महिन्याभरात सलमा धरणावर हल्ल्याचा हा दुसरा प्रयत्न होता.अफगाणी लष्कराच्या चोवीस तासातील कारवाईत तालिबानचे 125 दहशतवादी ठार - तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाची चिंता

कतार येथील वाटाघाटीद्वारे आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या तालिबानने, गेल्या काही आठवड्यांमध्ये अफगाणिस्तानात घडविलेल्या हत्याकांडाची माहिती समोर येऊ लागली आहे. गझनी प्रांताच्या मालिस्तान जिल्ह्यात तालिबानने 43 नागरिकांची निघृण हत्या घडवून आपल्या संपत्तीची लूट केली, असा आरोप स्थानिक करीत आहेत.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत 47 टक्क्यांची वाढ झाल्याची खळबळजनक माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 1,659 जणांचा बळी गेला असून यामध्ये 468 मुल आणि 219 महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही भयावह वाढ असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

leave a reply