अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर लादलेले कर व निर्बंध काढून टाकावेत

- वाटाघाटीत चीनची आक्रमक मागणी

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने चीनच्या उत्पादनांवर लादलेले कर व निर्बंध काढून टाकावेत, अशी आक्रमक मागणी चीनच्या राजवटीने केली आहे. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर, चीन अमेरिकेची धोरणे व निर्णयांविरोधात अधिक ठाम भूमिका घेत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यात अमेरिका व चीनमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकांमध्ये याची झलक पहायला मिळाली होती. व्यापारासंदर्भात झालेल्या बैठकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे.

गेल्या चार वर्षात अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात आक्रमक निर्णयांचा धडाका लावला होता. व्यापारी लूट, तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्व, शिक्षणसंस्थांमधील गुंतवणूक अशा अनेक मुद्यांवर ट्रम्प प्रशासनाने एकापाठोपाठ एक आदेश काढून चीनची कोंडी करण्यास सुरुवात केली होती. या कारवाईने अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेवर तीव्र टीकास्त्र सोडताना प्रत्युत्तराचे इशारेही दिले होते. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून चीनविरोधात सौम्य धोरण राबवायचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार बायडेन प्रशासन वेगवेगळ्या मुद्यांवर चीनशी चर्चा करीत आहे.

शनिवारी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताय व चीनचे उपपंतप्रधान लिऊ हे यांच्यात ‘व्हर्च्युअल’ बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेने चीनबरोबर झालेल्या ‘फेज वन ट्रेड डील’ची अंमलबजावणी व ‘नॉन मार्केट प्रॅक्ट्रिसेस’चा मुद्दा उपस्थित केला. त्याला प्रत्युत्तर देताना चीनने आपण कराराचे पालन करीत असून अमेरिकेच्या निर्णयांमुळेच त्यात अडथळे येत असल्याचा आरोप केला. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर लादलेले कर तसेच निर्बंध मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी चीनने यावेळी केली.

चीनची ही मागणी गेल्या काही महिन्यात अमेरिकेविरोधात स्वीकारलेल्या आक्रमक धोरणाचा भाग दिसत आहे. जुलै महिन्यात चीनने अमेरिकेच्या सहा माजी वरिष्ठ अधिकार्‍यांवर निर्बंध लादले होते. त्यानंतर अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत, अमेरिकेला संबंध सुधारण्याची इच्छा असेल तर, अमेरिकेने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे चीनने बजावल्याचेही समोर आले होते. दोन देशांमधील संबंधांमध्ये अत्यंत गंभीर अडचणी कायम असून त्यासाठी अमेरिकाच कारणीभूत आहे, असा आरोपही चीनने यावेळी केला होता.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेतही, दोन्ही देशांनी एकत्र काम केले तर त्याचा फायदा उभय देशांना व जगालाही होऊ शकेल आणि तसे न होता संघर्ष झाला तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील, असा इशारा जिनपिंग यांनी दिल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला होता. या कॉलनंतर काही दिवसांनी ‘हुवेई’च्या वँगझाऊ मेंग यांची झालेली सुटका, चीनच्या राजवटीने अमेरिकेविरोधात राबविलेल्या धोरणाचा विजय असल्याचे दावेही करण्यात आले होते.

तैवान, हॉंगकॉंग आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाई यापैकी कुठल्याही आघाडीवर चीन माघार घ्यायला तयार नाही. उलट बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर चीनच्या आक्रमकतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची नोंद जगभरातील विश्‍लेषक करीत आहेत. ज्यो बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कमजोर राष्ट्राध्यक्ष आहेत, याची जाणीव चीनला झालेली आहे. त्यामुळे बायडेन आपल्या विरोधात कुठल्याही स्वरुपाची कारवाई करणार नाही, याची खात्री चीनला पटलेली असून यामुळेच चीनच्या बेलगाम कारवाया सुरू असल्याचे आरोप अमेरिकेत होत आहे.

leave a reply