अमेरिकेच्या लष्कराकडून ‘स्पेशल ऑपरेशन्स’सह सायबर व स्पेस कमांडच्या ‘ट्रायड’ची घोषणा

Special-Operationsवॉशिंग्टन – अमेरिकेच्या लष्कराने अंतराळ व सायबरक्षेत्रासह ‘स्पेशल ऑपरेशन्स’ राबविणाऱ्या कमांडस्‌‍ना एकत्र करून नव्या ‘ट्रायड’ची उभारणी केली आहे. मंगळवारी सुरू झालेल्या ‘स्पेस ॲण्ड मिसाईल डिफेन्स सिम्पॉसिअम’मध्ये ही घोषणा करण्यात आली. ‘सायबर तंत्रज्ञान व स्पेशल ऑपरेशन्समधील कौशल्य यांच्या सहाय्याने लष्कराच्या अंतराळक्षेत्रातील क्षमता अधिक प्रभावीपणे वापरता येतील. नव्या त्रिरचनेमुळे वैयक्तिक स्तरावरील क्षमतांचा उपयोग अधिक परिणामकाररित्या करता येऊ शकतो’, अशा शब्दात लेफ्टनंट जनरल डॅनिअल कार्बलर यांनी नव्या ‘ट्रायड’ची माहिती दिली. लेफ्टनंट जनरल डॅनिअल कार्बलर हे अमेरिकी लष्कराच्या ‘स्पेस ॲण्ड मिसाईल डिफेन्स कमांड’चे प्रमुख आहेत.

Triadआधुनिक व बदलत्या युद्धतंत्रात अंतराळ, सायबर व स्पेशल ऑपरेशन्स या तिन्ही विभागांमधील कौशल्य तसेच क्षमतांचा एकत्रित वापर होऊन रणांगणावर प्रभावी धोरण तसेच मोहिमा राबविता याव्यात, हा नव्या ‘ट्रायड’मागील उद्देश असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी स्ट्रॅटेजिक कमांडमध्ये काम केलेल्या डॅनिअल कार्बलर यांनीच नव्या ‘ट्रायड’ची संकल्पना मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेचे प्रतिस्पर्धी एकाच वेळी अनेक आघाड्यांवरून हल्ले करीत असून या पार्श्वभूमीवर तीन विभागांचा एकत्रित वापर करण्याची योजना तयार करण्यात आल्याचेही ‘स्पेस ॲण्ड मिसाईल डिफेन्स सिम्पॉसिअम’मध्ये सांगण्यात आले.

तीन विभागांच्या क्षमतांचा एकत्रित वापर झाल्यास एकाच कमांडमधील गटांना सायबरक्षेत्रातील सुविधांची सुरक्षा सांभाळण्याची अथवा ‘इन्फोर्मेशन वॉरफेअर सेल्स’ तयार करण्याची जबाबदारी निभावता येईल, या शब्दात ‘युएस स्पेस कमांड’चे वरिष्ठ अधिकारी जेम्स डिकिन्सन यांनी आपली भूमिका मांडली. अंतराळ क्षेत्रातील क्षमता आणि सायबर व स्पेशल ऑपरेशन्सच्या क्षमतांचे मिश्रण प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी नवे पर्याय खुले करु शकते, असा दावाही त्यांनी केला. अमेरिकी लष्कराच्या युद्धविषयक धोरणात ‘मल्टिडोमेन ऑपरेशन्स’चा समावेश असून त्यात नव्या ‘ट्रायड’ची भूमिका महत्त्वाची ठरु शकते, याकडे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंड जनरल जॉन ब्रागा यांनी लक्ष वेधले.

वर्षाच्या अखेरीस अमेरिकी लष्कराचा ‘प्रोजेक्ट कन्व्हर्जन्स २०२२’ या बहुदेशीय सराव आयोजित होणार आहे. या सरावात ‘ट्रायड’ची संकल्पना वापरली जाणार असून त्यासाठी प्रशिक्षण सुरू झाल्याचे संकेत लष्करी अधिकाऱ्यांनी दिले.

leave a reply