अफगाणिस्तानात हक्कानी गटाचा वरिष्ठ कमांडर आत्मघाती स्फोटात ठार

afghan-suicide-blastइस्लामाबाद – तालिबानमधील हक्कानी नेटवर्कचा वरिष्ठ कमांडर रहिमुल्ला हक्कानी हा काबुलमधील आत्मघाती स्फोटात ठार झाला. अफगाणिस्तानात प्रभावशाली असलेल्या हक्कानी गटासाठी हा मोठा हादरा मानला जातो. रहिमुल्लाच्या हत्येसाठी ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याकडे अफगाणी माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर तालिबानमधील हक्कानी तसेच कंदहारी गटातील वैरामुळे देखील रहिमुल्लावर हल्ला झाला असावा, असा दावा केला जातो. दरम्यान, रहिमुल्ला हक्कानीचे पाकिस्तानशी ‘कनेक्शन’ असल्याची माहिती समोर येत आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका कार्यक्रमात रहिमुल्ला हक्कानी सहभागी झाला होता. यावेळी आत्मघाती दहशतवाद्याने घडविलेल्या हल्ल्यात रहिमुल्ला मारला गेला. आत्मघाती दहशतवाद्याने कृत्रिम पायामध्ये स्फोटके लपविली होती, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या स्फोटात आणखी कितीजण मारले गेले, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण स्फोट शक्तीशाली होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रहिमुल्लावरील हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी यासाठी ‘आयएस’ जबाबदार असल्याचा दावा केला जातो. याआधीही आयएसने रहिमुल्ला हक्कानीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. रहिमुल्ला हा आयएसचा कडवा विरोधक होता. काबुलमधील आपल्या प्रचारसभांमध्ये रहिमुल्लाने अनेकवेळा ‘आयएस’वर टीका केली होती. याचा सूड घेण्यासाठी ‘आयएस’ने रहिमुल्लाला लक्ष्य केले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

rahimullah-haqqaniपण त्याचबरोबर रहिमुल्लावरील या हल्ल्याकडे तालिबानमधील अंतर्गत संघर्ष म्हणून देखील पाहिले जात आहे. तालिबानने अफगाणिस्तानची राजवट हाती घेऊन एक वर्ष लोटले आहे. या काळात तालिबानमधील तीव्र मतभेद समोर आले आहेत. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या हक्कानी नेटवर्ककडे अफगाणिस्तानची सूत्रे असल्याने तालिबानमधील इतर गटांमध्ये असंतोष खदखदत आहे. यामध्ये तालिबानचा कंदहारी गट आघाडीवर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कुनार प्रांतात हक्कानी आणि कंदहारी गटात संघर्ष उडाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याचा मुलगा व सध्याच्या राजवटीतील संरक्षणमंत्री मुल्ला याकूब आणि उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांनी हक्कानी गटाविरोधात भूमिका घेतली होती. पण पाकिस्तानच्या हस्तक्षेपानंतर कंदहारी गटाला माघार घ्यावी लागली होती. याचा संताप कंदहारी तसेच तालिबानमधील इतर गटांमध्ये वाढत चालला आहे. त्यामुळे अंतर्गत संघर्षातून रहिमुल्ला याला ठार केले असावे, असा दावाही केला जात आहे.

रहिमुल्लावरील हल्ला हा हक्कानी गटासाठी सर्वात मोठा इशारा ठरतो. यामुळे तालिबानमध्ये संघर्ष पेटून अफगाणिस्तान पुन्हा गृहयुद्धाकडे ढकलला जाईल, असे अफगाणी विश्लेषकांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येण्याआधी रहिमुल्ला हक्कानी पाकिस्तानच्या पेशावर प्रांतात कट्टरवाद्यांना प्रशिक्षण देत होता. तरुणांना आत्मघाती हल्ल्यासाठी तयार करणे, याची जबाबदारी रहिमुल्लावर होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील ड्रोन हल्ल्यात ‘तेहरिक-ए-तालिबानचा वरिष्ठ कमांडर ओमर खालिद खोरासानी मारला गेला होता. खोरासानीच्या हत्येसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा दावा केला जातो. त्यानंतर पाकिस्तानसंलग्न हक्कानी गटाच्या रहिमुल्ला हक्कानी ठार झाल्यामुळे अफगाणिस्तानात नवा संघर्ष पेट घेत असल्याचे दिसत आहे.

leave a reply