‘वुहान लॅब लीक’च्या दाव्याला अमेरिकेच्या प्रयोगशाळेचा दुजोरा

वॉशिंग्टन – ‘सार्स-कोव्ही-2’ नावाने ओळखला जाणारा कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याची शक्यता अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने मान्य केली आहे. अमेरिकेच्या प्रयोगशाळेने 2020 सालीच हा अहवाल दिला होता. हा अहवाल एका अमेरिकी दैनिकाने प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी कोरोनाच्या तपासाबाबत चीनला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पण अमेरिकेकडून कोरोनाबाबत चीनवर केले जाणारे आरोप म्हणजे 12 वर्षांपूर्वी इराकवर सामुदायिक संहाराची शस्त्रे बाळगल्याच्या आरोपांसारखेच बनावट असल्याचा शेरा चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी मारला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत अधिक माहिती देण्यासाठी चीनला भाग पाडता येणार नाही, अशी अजब प्रतिक्रिया दिली आहे.

प्रयोगशाळेचा दुजोराकोरोनाची साथ पसरल्यानंतर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच्या तपासाचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ‘लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लेबॉरेटरी’ने कोरोनावर संशोधन करून नोंदविलेल्या प्राथमिक अहवालात हा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. याबाबतचे दोन प्राथमिक पातळीवरील तर्क मांडण्यात आले होते. कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत झालेल्या एखाद्या अपघातामुळे बाहेर पसरला असावा किंवा प्राण्यामध्ये किंवा मानवामध्ये संक्रमित होऊन हा विषाणू इथून बाहेर फैलावला, अशा या दोन शक्यता आहेत. मात्र याबाबत अधिक संशोधनाची गरज असल्याचे या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

त्याचवेळी हा विषाणू नैसर्गिकरित्या आलेला नाही किंवा वटवाघूळ अथवा अन्य प्राण्यामध्ये संक्रमण होऊन हा विषाणू पसरलेला नाही. कारण फैलाव होऊन 18 महिने झाल्यानंतरही या विषाणूचे संक्रमण झालेली वटवाघूळे किंवा अन्य प्राणी मिळालेले नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाची साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली या संशयाला अधिकच बळ मिळत आहे. याबाबत चीनवरील संशय वाढत असताना, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी चीनने कोरोनाच्या तपासासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. आपल्यावरील संशय व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी चीनची आहे, असे सुलिवन यांनी बजावले.

प्रयोगशाळेचा दुजोरामात्र जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ अधिकारी माईक रेआन यांनी कोरोनाचा तपास करण्यासाठी चीनला सहकार्य करण्यास भाग पाडण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही केवळ चीनकडे सहकार्याची मागणी करू शकतो, अशी हतबल प्रतिक्रिया रेआन यांनी दिली आहे. जगभरात 35 लाखाहून अधिकजणांचा बळी घेणार्‍या या साथीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेली ही बोटचेपी भूमिका या संघटनेच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍न उपस्थित करीत आहे.

दरम्यान, वुहानच्या प्रयोगशाळेतच कोरोनाचा विषाणू तयार करण्यात आला व पसरविण्यात आला, हा आरोप अधिकाधिक तीव्र होत असताना, चीनने मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेने अजूनही अधिकृत पातळीवर कोरोनाबाबत चीनवर आरोप केलेले नाहीत. पण अमेरिकी संशोधक, माध्यमे आणि प्रमुख नेत्यांनी केलेल्या आरोपांचे फार मोठे दडपण चीनवर आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 12 वर्षांपूर्वी अमेरिकेने इराकमध्ये ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ अर्थात सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे असल्याचा आरोप करून इराकवर हल्ला चढविला होता. पण पुढच्या काळात अशी शस्त्रे इराकमध्ये सापडली नव्हती. याचा दाखला देऊन चीनच्या अमेरिकेतील दूतावासाचे प्रवक्ते लियु पेंग्यू यांनी चीनवर कोरोनाबाबत केले जाणारे आरोप असेच खोटे असल्याचे म्हटले आहे.

भारतीय संशोधकांनी वर्षभरापूर्वी कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नसल्याचे सांगून याची निर्मिती प्रयोगशाळेत झाल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. पण त्यावेळी अमेरिकेचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. फॉसी यांनी भारतीय संशोधकांनी मांडलेला हा निष्कर्ष जगावेगळा असल्याचा शेरा मारून त्याची खिल्ली उडविली होती. यामुळे अमेरिकेचे आरोग्यविषयक सल्लागार चीनसाठी खिंड लढवित असल्याची बाब समोर आली होती. पण आता चीनचा बचाव करणारे डॉ. फॉसी स्वतःच अडचणीत आले आहेत. अमेरिकेत त्यांच्या विरोधात कमालीचा असंतोष खदखदत आहे.

कोरोनाचा विषाणू नैसर्गिक असल्याचे दावे करणारे डॉ. फॉसी बराच काळ आपल्या दाव्यांवर ठाम राहिले. याकडे लक्ष वेधून काही भारतीय विश्‍लेषक चीनने अमेरिकेच्या संशोधन क्षेत्रात केलेल्या घुसखोरीचा दाखला देत आहेत. या घुसखोरीचा प्रभाव स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला या भारतीय विश्‍लेषकांनी लगावला आहे.

leave a reply