इराणच्या इंधन, क्षेपणास्त्रांच्या तस्करीवर अमेरिकन नौदलाची मोठी कारवाई

क्षेपणास्त्रांच्या तस्करीवरवॉशिंग्टन – अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या इंधन आणि क्षेपणास्त्रांच्या तस्करीवर आत्तापर्यतची सर्वात मोठी कारवाई केली. इराणने येमेनमधील हौथी बंडखोरांसाठी अवैधरित्या निर्यात केलेली दीडशेहून अधिक क्षेपणास्त्रे ताब्यात घेतल्याचे अमेरिकेच्या न्यायविभागाने जाहीर केले. व्हिएन्ना येथे इराणबरोबर अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी कोंडीत सापडल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी अमेरिकेच्या न्यायविभागाने इराणच्या क्षेपणास्त्र व इंधन तस्करीची माहिती उघड केली आहे.

अमेरिकेच्या नौदलाने नोव्हेंबर २०१९ आणि फेब्रुवारी २०२०, अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अरबी समुद्रात मोठी छापेमारी केली. यापैकी २०१९ सालच्या कारवाईत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने येमेनमधील हौथी बंडखोरांसाठी रवाना केलेला शस्त्रसाठा अमेरिकेच्या नौदलाने जप्त केला. यामध्ये जमिनीवरुन हवेत मारा करणारी १७१ क्षेपणास्त्रे, आठ रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे विनाशिकाभेदी क्रूझ् क्षेपणास्त्रे तसेच इतर साहित्यांचा समावेश होता, अशी माहिती अमेरिकेच्या न्यायविभागाने प्रसिद्ध केली.

तर २०२० साली पुन्हा अरबी समुद्रातच केलेल्या कारवाईत ११ लाख बॅरेल्स इंधनाची तस्करी करणारी चार जहाजे अमेरिकेच्या नौदलाने ताब्यात घेतली. परदेशी टँकरच्या नावाखाली इराण अवैधरित्या व्हेनेझुएलासाठी ही इंधनाची अवैध निर्यात करीत होता, असा आरोप अमेरिकेच्या न्यायविभागाने केला. इंधनाचा हा जप्त केलेला साठा ताब्यात घेऊन नंतर त्याची दोन कोटी ६० लाख डॉलर्समध्ये विक्री केली. तसेच दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्यांसाठी हा निधी वापरल्याची माहिती न्यायविभागाने दिली.

अमेरिकेची ही कारवाई इराण आणि इराणचे गुन्हेगारी नेटवर्क चालविणार्‍या रिव्होल्युशनरी गार्ड्ससाठी जबर धक्का देणारी ठरली, असा दावा अमेरिकन न्यायविभागाचे सह ऍटर्नी जनरल मॅथ्यू ओल्सन यांनी केला. या तस्करीमध्ये सहभागी असलेली इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स लष्कराला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे अमेरिकन नौदलाची ही कारवाई पूर्णपणे वैध आणि आंतरराष्ट्रीय नियमांना धरून होती, असे अमेरिकेने म्हटले आहे.

क्षेपणास्त्रांच्या तस्करीवर२०१९ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील केले होते. आखातातील दहशतवादी कारवायांमध्ये इराणचा लष्करी गट सहभागी असल्याचे सांगून ट्रम्प प्रशासनाने ही कारवाई केली होती. त्यानंतर इराणने देखील आखातातील अमेरिकेच्या लष्कराला दहशतवादी संघटना जाहीर करून प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान, येमेनमधील हौथी बंडखोर सौदी अरेबिया तसेच इतर अरब देश आणि त्यांच्या हितसंबंधांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवित आहेत. दोन दिवसांपूर्वीच हौथींची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सौदीची राजधानी रियाधपर्यंत धडकली होती. इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स या हौथी बंडखोरांना शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप अमेरिका, इस्रायल आणि सौदीने केला होता. इराणने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते.

सध्या व्हिएन्ना येथे इराणबरोबर अणुकराराबाबत अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू आहेत. अणुकरारात सामील होण्यासाठी इराणने केलेल्या मागण्यांमुळे सदर वाटाघाटी स्थगित झाल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या न्यायविभागाने वर्षभरापूर्वीची माहिती उघड करून इराणवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

leave a reply