अमेरिका-इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याचा सराव करणार?

- इस्रायली व आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा

इराणच्या अणुप्रकल्पांवरजेरूसलेम/वॉशिंग्टन – अमेरिका, इस्रायलचे हवाईदल लवकरच इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याचा संयुुक्त सराव करतील. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांमधील बैठकीनंतर याबाबतची घोषणा होईल. यासाठी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ अमेरिकेसाठी रवाना होत आहेत. इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अमेरिकी अधिकार्‍याचा हवाला देऊन ही माहिती प्रसिद्ध केली. गेल्याच महिन्यात इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख जनरल अविव कोशावी यांनी आपल्या हवाईदलाला इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला चढविण्याचा सराव करण्याचे आदेश दिले होते. लवकरच इस्रायलचे हवाईदल या हवाईसरावाचे आयोजन करणार आहेत. अशा परिस्थितीत, इस्रायल आणि अमेरिकेची लढाऊ विमाने इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्याचा सराव करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

व्हिएन्ना येथे सुरू असलेली चर्चा फिस्कटली आणि इराणने अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले तर, त्यापुढील तयारी म्हणून अमेरिका या सरावात सहभागी होत आहे. २०२२ सालच्या मध्यावर भूमध्य समुद्रात या सरावाचे आयोजन केले जाईल, असे अमेरिकी अधिकार्‍याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

इराणच्या अणुप्रकल्पांवरयामध्ये अमेरिका व इस्रायलच्या हवाईदलातील ‘एफ-३५’, ‘एफ-१६ आणि ‘एफ-१५’ लढाऊ विमानांबरोबर टेहळणी विमाने आणि इंधनवाहू विमानांचा देखील समावेश असेल. इस्रायलमधून उड्डाण करणारी ही विमाने भूमध्य समुद्राच्या दिशेने किमान एक हजार किलोमीटरपर्यंत उड्डाण करतील. इस्रायलपासून इराणच्या अणुप्रकल्पांपर्यंतचे अंतर लक्षात घेऊन या सरावाचे आयोजन करण्यात येईल. याबाबत चर्चा करण्यासाठी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ गुरुवारी अमेरिकेसाठी रवाना होतील.

दरम्यान, इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या अमेरिकी अधिकार्‍याच्या हवाल्याने ही माहिती देत आहेत. पण याबाबत दोन्ही देशांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इस्रायली संरक्षणमंत्री गांत्झ यांनी अमेरिकेसाठी रवाना होण्याआधी, इराण हा इस्रायलचे अस्तित्व व जागतिक शांतीसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याबाबत अमेरिकी अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिली. त्यामुळे अमेरिका व इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांमधील या चर्चेकडे गांभीर्याने पाहिले जाते.

leave a reply