लोकशाही व हुकूमशाहीमधील संघर्षात अमेरिका तैवानच्या बाजूने

- अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी

लोकशाहीतैपेई – ‘जगात लोकशाही आणि हुकूमशाहीमध्ये संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने तैवानसह जगभरात लोकशाहीचे संरक्षण करण्याचा पोलादी निर्धार केलेला आहे’, असे सांगून कुठल्याही परिस्थितीत अमेरिका तैवानला वाऱ्यावर सोडणार नाही, असा संदेश अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी दिला. आपल्या वादग्रस्त तैवान भेटीत त्यांनी दिलेले हे आश्वासन म्हणजे चीनला थेट आव्हान असल्याचे दावे केले जातात. यामुळे खवळलेल्या चीनने बुधवारी 21 लढाऊ विमाने तैवानच्या हवाई हद्दीत घुसवून आपला असंतोष व्यक्त केला.

पेलोसी यांनी तैवानला भेट दिली, तर त्याचे भयंकर परिणाम होतील व या परिणामांना चीन जबाबदार नसेल, अशी धमकी चीनचे उपपरराष्ट्रमंत्री शी फेंग यांनी दिली होती. चीनची मुखपत्रे तर पेलोसी यांचे विमान पाडण्याचे इशारे देत होती. त्याचवेळी पेलोसी यांचा हा दौरा म्हणजे तैवानचे विलिनीकरण करण्यासाठी चीनसमोर चालून आलेली संधीच असल्याचे दावे करण्यात येत होते. मात्र या धमक्यांची पर्वा न करता पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या. अमेरिकेने अजूनही ‘वन चायना पॉलिसी’ अर्थात तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे धोरण स्वीकारलेले नाही, असे पेलोसी यांनी या भेटीत जरूर सांगितले.

पण अमेरिका चीनपासून तैवानचे लष्करीदृष्ट्या संरक्षण करील, याची ग्वाही पेलोसी यांनी या भेटीत दिली. इतकेच नाही तर चीन व तैवानमधील संघर्ष म्हणजे हुकूमशाही आणि लोकशाहीमधला संघर्ष असल्याचे सांगून तैवानची बाजू घेणे हे अमेरिकेचे नैतिक कर्तव्य ठरते, याची जाणीव यावेळी पेलोसी यांनी करून दिली. या दौऱ्यात पेलोसी यांनी केलेली विधाने वैयक्तीक स्वरूपाची आहेत, त्यांच्याशी अमेरिकेचे व्हाईट हाऊस सहमत नाही, अशी घोषणा अमेरिकेने केलेली आहे. तरीही जगभरातील माध्यमांनी पेलोसी यांनी तैवानबाबत केलेले दावे उचलून धरले आहेत. चीन देखील व्हाईट हाऊसने दिलेला खुलासा स्वीकारायला तयार नाही.

leave a reply