अमेरिकेबरोबरील सहकार्यासाठी पाकिस्तानने जवाहिरीचा बळी दिला

- पाकिस्तानच्याच पत्रकारांचा दावा

जवाहिरीन्यूयॉर्क – अल जवाहिरी याला ठार केल्यानंतर अमेरिकेने जगभरातील आपल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जवाहिरीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अल कायदाचे दहशतवादी अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करीतल, ही शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील आपल्या नागरिकांना ही सूचना केली. त्याचवेळी जवाहिरीला लक्ष्य करणाऱ्या अमेरिकेच्या ‘एमक्यू-9 रिपर ड्रोन’ने नक्की कुठून उड्डाण केले आणि या हल्ल्यासाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरली का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. इतकेच नाही तर जवाहिरीची माहिती अमेरिकेच्या ‘सीआयए’ला पाकिस्ताननेच पुरविल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेचे सहकार्य मिळविण्यासाठी पाकिस्तानने जवाहिरीचा बळी दिला असावा, अशी चर्चा खुद्द पाकिस्तानचेच पत्रकार करीत आहेत. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये येण्याआधी अल जवाहिरी पाकिस्तानातच होता, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. तसेच तालिबानच्या हक्कानी गटाचा कमांडर अझिज हक्कानी यानेच जवाहिरीला मे महिन्यात काबुलमध्ये आणल्याचा दावा केला जातो. हक्कानी नेटवर्क हा पाकिस्तानशी संधान बांधून असलेला तालिबानचा गट आहे. त्यामुळे अमेरिकेला जवाहिरीचा ठावाठिकाणा पाकिस्ताननेच कळविला असावा, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. यामुळे दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तान दोन्ही बाजूंनी खेळत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा जगासमोर येत आहे.

जवाहिरीजवाहिरीवर हल्ला होण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची अमेरिकेचे नेते व अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती, याकडे पाकिस्तानचीच माध्यमे लक्ष वेधत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचे कर्जसहाय्य रोखून धरले आहे. त्याचवेळी ‘फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमधून अजूनही पाकिस्तानची सुटका झालेली नाही. या दोन्ही गोष्टींच्या मोबदल्यात पाकिस्तानी लष्कराने जवाहिरीची खबर अमेरिकेला पुरविल्याचा दावा पाकिस्तानातील एका बुजूर्ग पत्रकाराने केला. अमेरिकेचे सहकार्य मिळविल्याखेरीज तरणोपाय नाही, याची जाणीव पाकिस्तानला झाली आहे.

जवाहिरीअफगाणिस्तानातील लष्करी मोहिमेसाठी पाकिस्तानने अमेरिकेला सहकार्य करण्याचे नाकारल्यानंतर, संतापलेल्या अमेरिकेची मनधरणी करण्यासाठी पाकिस्तानला काहीतरी करणे भागच होते. जवाहिरीची खबर देऊन पाकिस्तानने अमेरिकेची मर्जी परत मिळविण्याचा प्रयत्न केला असावा, असे या पाकिस्तानी पत्रकाराचे म्हणणे आहे.

त्याचवेळी जवाहिरीला टिपणाऱ्या अमेरिकेच्या एमक्यू-9 रिपर ड्रोनने नक्की कुठून उड्डाण केले व या हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर झाला का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या हल्ल्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची हवाई हद्द वापरली असेल, तर त्यासाठी रितसर परवानगी घेतली होती का? असाही प्रश्न काही विश्लेषकांनी विचारला आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या या हल्ल्यासाठी खबर पुरविण्यापासून ते हवाई हद्द वापरू देण्याचा निर्णय घेतला असेल, तर पुढच्या काळात याचे भयंकर परिणाम आपल्या देशाला भोगाव लागतील, अशी चिंता या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. तालिबान तसेच अल कायदाचे दहशतवादी आपल्या नेत्याला ठार करण्यासाठी सहाय्य पुरविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविल्यावाचून राहणार नाहीत, अशी भीती हे विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply