रशियावर निर्बंध लादून अमेरिका आगीशी खेळ करीत आहे

- रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खरमरीत इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेने आक्रमक रशियाविरोधी भूमिका घेऊन आगीशी खेळण्याचा प्रयत्न करु नये, असा खरमरीत इशारा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने दिला. मंगळवारी अमेरिकेने अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी प्रकरणावरून रशियाविरोधात कडक निर्बंधांची घोषणा केली होती. त्याविरोधात रशियानेही जोरदार प्रत्युत्तर दिले असून उलट निर्बंध लादण्यात येतील, असे बजावले आहे. नॅव्हॅल्नी प्रकरणावरून लादलेले निर्बंध ही?अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाविरोधात केलेली पहिली मोठी कारवाई ठरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर प्राणघातक विषप्रयोग झाला होता. नॅव्हॅल्नी यांच्यावरील या विषप्रयोगासाठी रशियन सरकार जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. जानेवारी महिन्यात नॅव्हॅल्नी रशियात माघारी आल्यानंतर त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. त्याविरोधात नॅव्हॅल्नी यांच्या समर्थकांनी व्यापक आंदोलन सुरू केले असून सलग महिनाभर रशियाच्या विविध शहरात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांविरोधात रशियन राजवटीने आक्रमक भूमिका घेतली असून आतापर्यंत सुमारे आठ हजारांहून अधिक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नॅव्हॅल्नी यांच्यावर झालेला विषप्रयोग व रशियाकडून निदर्शकांवर सुरू असलेल्या कारवाईवरून पाश्‍चात्य देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. रशियात राष्ट्राध्यक्ष पुतिन विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आरोप करण्यात आले होते. काही युरोपिय देशांनी रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टीही केली होती. त्यानंतर आता अमेरिकेने निर्बंध जाहीर करून रशियाला कडक संदेश दिल्याचे मानले जाते. मंगळवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियातील सात वरिष्ठ अधिकारी व १४ उपक्रमांवर निर्बंधांची घोषणा केली. त्यात रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख तसेच दोन उपसंरक्षणमंत्र्याचा समावेश आहे.

बायडेन प्रशासनाच्या या कारवाईवर रशियाकडून तिखट प्रतिक्रिया उमटली. ‘अमेरिकेने रशियाविरोधात हल्ला करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. आमच्या सहकार्‍यांनी असे आगीशी खेळण्याचे प्रयत्न करू नयेत’, असा इशारा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने दिला. ‘अमेरिकेचे निर्बंध ही रशियाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी पुढे करण्यात आलेली निव्वळ सबब आहे. रशिया हे कधीही खपवून घेणार नाही. निर्बंध अथवा इतर प्रकारच्या दडपणातून रशियावर काहीही लादण्याचे प्रयत्न यापूर्वी अपयशी ठरले आहेत आणि आताही तेच होईल. अमेरिकेच्या कारवाईला रशिया त्याच भाषेत प्रत्युत्तर देईल’, असे रशियाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी बजावले.

अमेरिकेपाठोपाठ युरोपिय महासंघानेही रशियाविरोधात निर्बंधांची घोषणा केली आहे. महासंघाने रशियाच्या चार वरिष्ठ अधिकार्‍यांवर प्रवेशबंदी जाहीर केली असून त्यांच्या मालमत्ता गोठविण्यात येतील, असेही स्पष्ट केले. युरोपने लादलेल्या निर्बंधांमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तिय असणारे ‘नॅशनल गार्ड’चे प्रमुख व्हिक्टर झोलोटोव्ह यांचा समावेश आहे. महासंघाने निर्बंध लादल्यास रशिया त्याच्याबरोबरील संबंध तोडण्याचे पाऊल उचलू शकते, असे रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी यापूर्वीच बजावले होते.

leave a reply