कोरोनाची लस विकसित करणार्‍या चिनी कंपनीचा ‘बायोवॉरफेअर प्रोग्राम’शी संबंध

- तैवानच्या वेबसाईटचा आरोप

तैपेई/बीजिंग – चीनमध्ये कोरोनाव्हायरसवर लस तयार करणारी कंपनी ‘सिनोफार्म’चे चिनी लष्कराकडून चालविण्यात येणार्‍या ‘बायोवॉरफेअर प्रोग्राम’शी संबंध असल्याचे आरोप परदेशी संशोधक व विश्‍लेषकांनी केले आहेत. ‘सिनोफार्म’ची लस ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स’ (डब्ल्यूआयबीपी) या उपक्रमाच्या अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. हा उपक्रम ‘ड्युअल युज बायोवॉरफेअर फॅसिलिटी’ असल्याची माहिती चीननेच १९९०-२०००च्या दशकात दिली होती. त्यामुळे चीन आता लसीचा वापरही जैविक युद्धासाठी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

२०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेल्या कोरोनाव्हायसरच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून त्यात २५ लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. वुहानमधून सुरू झालेली साथीचा मूळ विषाणू चीनच्याच प्रयोगशाळांमध्ये कृत्रिमरित्या तयार करून त्याचा जाणीवपूर्वक फैलाव करण्यात आल्याचे आरोप जगभरातून होत आहेत. हे आरोप करणार्‍यांमध्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियासह युरोपिय देशांमधील तज्ज्ञ, संशोधक तसेच विश्‍लेषकांचा यात समावेश आहे.

अमेरिकेचा परराष्ट्र विभाग तसेच गुप्तचर यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या अहवालांमध्येही ही बाब मान्य करण्यात आली आहे. वुहानमधील प्रयोगशाळा चीनच्या लष्कराशी संबंधित असल्याचे व त्यात विषाणूची निर्मिती करून तो फैलावल्यासंदर्भातील पुरावे उपलब्ध असल्याचेही अमेरिकी अधिकार्‍यांनी जाहीर केले होते.

तैवानच्या एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तात, चीनमधील लस तयार करणारी कंपनी ‘बायोवॉरफेअर प्रोग्राम’शी निगडित असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या दोन दशकात विविध संशोधक तसेच तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त देण्यात येत असल्याचे तैवानी वेबसाईटने म्हटले आहे. लेखात अमेरिकी संशोधक एरिक क्रॉडी, इस्रायली गुप्तचर तसेच विश्‍लेषक डॅनी शोहाम, तैवानधील सुरक्षाविषयक तज्ज्ञ तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे.

त्याचवेळी कोरोनाव्हायरसची निर्मिती केल्याचा आरोप असणारी ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ तसेच कोरोनावर लस तयार करणारा उपक्रम ‘डब्ल्यूआयबीपी’ एकाच संकुलात कार्यरत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. चीनच्या लष्कराकडून उभारण्यात आलेल्या तसेच त्याच्याशी संबंध असणार्‍या विविध यंत्रणा ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स’शी जोडलेल्या असल्याची माहितीही तैवानी वेबसाईटने आपल्या वृत्तात दिली आहे.

चीनच्या कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीत जवळपास ७०हून अधिक ‘साईड इफेक्ट्स’ असल्याचे आणि यापूर्वी सदर कंपनीने तयार केलेल्या लसी वादग्रस्त ठरल्याचा उल्लेखही वृत्तात करण्यात आला आहे. चीनने १९८४ साली ‘बायोवॉरफेअर कन्व्हेंशन’वर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. मात्र त्यानंतरही चीनच्या लष्कराकडून गुप्तरित्या ‘बायोवॉरफेअर प्रोग्राम’ चालविण्यात येत असल्याचे आरोप अमेरिकेने वारंवार केले आहेत. कोरोनाची साथ व त्याच्या लसीबद्दल समोर आलेल्या माहितीतून त्याला पुन्हा एकदा दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, रशियातील ‘लेव्हाडा सेंटर’ने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ६४ टक्के जणांनी कोरोनाव्हायरस हा जैविक युद्धाचाच नवा प्रकार असल्याचे मत नोंदविले आहे. त्याचवेळी ६० टक्क्यांहून अधिक जणांनी कोरोनावरील लस घेण्यासही नकार दिल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले.

leave a reply