अमेरिकेने दीड वर्षांच्या शटडाऊनसाठी तयार रहावे – फेडरल रिझर्व्हच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारा

वॉशिंग्टन – ‘येत्या काही महिन्यात कोरोनाव्हायरसच्या साथीवर प्रतिबंधात्मक लस सापडली नाही, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरणे अतिशय अवघड बनेल. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. म्हणूनच अमेरिकी जनतेने १८ महिन्यांच्या शटडाऊनला तोंड देण्यासाठी तयार रहावे लागेल’, असा इशारा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे वरिष्ठ अधिकारी ‘नील काशकारी’ यांनी दिला. अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता, इतर सार्‍या सेवा व सुविधा शटडाऊनच्या काळात बंद ठेवल्या जातात. याची तयारी अमेरिकी जनतेने करावी, असे सांगून नील काशकारी यांनी अमेरिकी जनतेला पुढच्या काळातील खडतर परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे.

अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मिनियापॉलीस प्रांतातील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष नील काशकारी यांनी कोरोनाव्हायरसची साथ आणि त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आलेला ताण, यावर चिंता व्यक्त केली. या आर्थिक तणावातून अमेरिकेची अर्थव्यवस्था पटकन बाहेर येईल, अशी फाजील अपेक्षा ठेवणे अनुचित ठरेल. जोपर्यंत कोरोनाव्हायरसची साथ रोखणारी लस सापडत नाही, तोपर्यंत अमेरिकी अर्थव्यवथा याच्या दुष्परिणामातून सावरु शकणार नाही, असा दावा काशकारी यांनी केला आहे.

पण, ‘कोरोनाव्हायरसची लस सापडण्यचा वैद्यकीय चमत्कार घडला नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला प्रदीर्घ आणि कठीण मार्गाने प्रवास करावा लागेल. हा प्रवास  १८ महिन्यांचा असेल व ह्या काळात अमेरिकी जनतेला शटडाऊनचा सामना करावा लागू शकतो. याची तयारी अमेरिकी जनतेने करायला हवी’, असे काशकारी यांनी बजावले आहे. यावेळी काशकारी यांनी अमेरिकन काँग्रेसकडे छोट्या उद्योगांसाठी आधी जाहीर केलेल्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची मागणी केली. गेल्या महिन्यात अमेरिकन काँग्रेसने या क्षेत्रासाठी ३५० अब्ज डॉलर्सची घोषणा केली होती.

नील काशकारी हे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. त्यांनी हा इशारा देण्याच्या काही तास आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी अर्थव्यवस्था खुली करण्याची घोषणा केली होती. अमेरिकी अर्थव्यवस्थेची हानी टाळणारी असेल तर हा निर्णय घेणे भाग आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर काशकारी यांनी हा इशारा दिला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिकेत लॉकडाउन सुरू आहे. या काळात अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या १६ लाखांवर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वैद्यकीय अधिकार्‍यांनी या साथीचे परिणाम दीड वर्षे सहन करावे लागतील, अशी भीती व्यक्त केली होती.

दरम्यान, याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘मेक्सिको वॉल’साठी केलेली आर्थिक तरतूद अमेरिकन संसदेने नामंजूर केल्यानंतर ट्रम्प यांनी शटडाऊनचे हत्यार उपसले होते. त्याच्याहीआधी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ‘ओबामा केअर’ या आपल्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविमा योजनेसाठी त्यांनीही शटडाऊनची घोषणा केली होती. या शटडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवांसाठी तरतूद करुन इतर सेवांना दिले जाणारे फंडिंग रोखले जाते. या अत्यावश्यक सेवांमध्ये लष्कर, पोलीस, अग्निशमन दल, वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे.

leave a reply