दक्षिण कोरियात बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण – ११६ रुग्ण सापडले

सेऊल – दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरसने पूर्णपणे बरे झालेल्या ११६ जणांना नव्याने या साथीची लागण झाली आहे. कोरोनाव्हायरसची ही दुसरी लाट आलेली असताना बुधवारी दक्षिण कोरियात संसदीय निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली जात असली तरी नियोजित वेळापत्रकानुसार ही निवडणूक पार पडेल, असे दक्षिण कोरियाच्या सरकारने स्पष्ट केले.

दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरसने २१७ जणांचा बळी घेतला आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या १०,०००वर गेली आहे. दक्षिण कोरियाने मोठया प्रमाणात कोरोनाव्हायरसच्या चाचण्या केल्या. जनतेनेही सरकारला चांगला प्रतिसाद दिला. विलगीकरण आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन केले. त्यामुळे इथली साथ आटोक्यात आली होती. ही साथ रोखण्यासाठी दक्षिण कोरियाचे मॉड्युल सर्वात यशस्वी ठरल्याचा दावा केला जात होता.

सोमवारी या साथीची लागण झालेल्यांची संख्या २५ इतकी कमी होती. अशा रितीने दक्षिण कोरियाने या साथीवर नियंत्रण मिळवल्याच्या बातम्या येत असताना, दक्षिण कोरियात या साथीची नवी लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे. या साथीतून बरे झालेल्या सुमारे ११६ जणांना पुन्हा याची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे एकदा या साथीच्या कचाट्यातून बाहेर पडल्यावर सुध्दा पुन्हा याची लागण होण्याचा धोका असल्याचे समोर येत आहे. तर काही जणांनी वैद्यकीय चाचण्यांवरुन प्रश्न उपस्थित केले आहे. बुधवारी दक्षिण कोरियात निवडणूक असून नव्याने या साथीची लाट आलेली असताना, सदर निवडणूक पुढे ढकलणे श्रेयस्कर ठरेल, अशी मागणी काहीजणांकडून केली जाते. मात्र दक्षिण कोरियाच्या सरकारने त्याला नकार दिला. नियोजित वेळापत्रकानुसार सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून ही निवडणूक पार पडेल, असे दक्षिण कोरियाच्या सरकारने स्पष्ट केले.

दरम्यान, बुधवारी दक्षिण कोरियामध्ये ३,५०० निवडणूक केद्रांवर मतदान पार पडणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व निवडणूक केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मतदारांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना या मतदार केंद्रामध्ये सोडले जाईल. त्यांना मास्क, सॉनेटायझर, ग्लोव्ज बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर क्वांरटाईन असणाऱ्यांना ई-मेलच्या माध्यमातून मतदान करता येईल.

leave a reply