कोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताला सहकार्य करण्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आश्‍वासन

वॉशिंग्टन – कोरोनाच्या लसीसाठी भारताला पुरविण्यात येणार्‍या कच्च्या मालावरील बंदी बायडेन प्रशासनाने मागे घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी तसे आदेश दिले आहेत. अमेरिकेत कोरोनाची साथ भरात असताना, भारताने आम्हाला सहकार्य केले होते, तसेच सहकार्य भारताला पुरविण्यासाठी अमेरिका बांधिल आहे, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरून ही घोषणा करणार्‍या बायडेन यांनी काही काळापूर्वी भारताला हे सहकार्य नाकारले होते. पण यावर अमेरिकेतूनच जळजळीत टीका सुरू झाल्यानंतर तसेच भारताने या प्रकरणी समज दिल्यानंतर, बायडेन यांच्यामध्ये हा बदल दिसू लागला आहे.

Advertisement

लवकरच भारताला आवश्यक असलेले सहाय्य अमेरिकेकडून पुरविले जाईल, असे उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीही सोशल मीडियावर जाहीर केले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉईड यांनीही भारताच्या नजिक असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना भारतासाठी आवश्यक असलेले सहाय्य पुरविण्याचे आदेश दिले आहेत. भारतात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेलेली असताना, हे सहाय्य पुरविणे अमेरिकेच्या जबाबदारीचा भाग ठरतो. कोरोनाची साथ अमेरिकेत धुमाकूळ घालत असताना, भारताने अमेरिकेला औषधे पुरविली होती, याची आठवण अमेरिकन लोकप्रतिनिधी व मुत्सद्दी तसेच विश्‍लेषकांनी करून दिली होती. त्याचा परिणाम बायडेन प्रशासनाच्या धोरणावर झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याच्याबरोबरीने बायडेन प्रशासनाच्या असहकार्याविरोधात भारत सरकारने स्वीकारलेली भूमिका हे देखील, यामागे प्रमुख कारण ठरते.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केल्याचे समोर आले होते. या चर्चेनंतर अमेरिकेने भारताला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी वेगाने पावले उचलली, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बायडेन प्रशासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेच्या भारताबरोबरील संबंधांवर होणारा विघातक परिणाम टळल्याचे दावे केले जातात. तसेच बायडेन यांच्या प्रशासनाने याबाबत निर्णय घेण्यासाठी लावलेल्या विलंबाची कारणे विश्‍लेषकांकडून दिली जात आहेत.

अमेरिकेच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्या भारताला कोरोना प्रतिबंधक लसी पुरविण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातच मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती झाली, तर अमेरिकन कंपन्यांना ही संधी मिळू शकत नाही. यामुळे सदर कंपन्यांच्या लॉबीने बायडेन प्रशासनावर दडपण टाकून त्यांना भारताला सहकार्य न करण्याचे आवाहन केले होते, अशी माहिती दिली जात आहे.

मात्र अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राने याच्या परिणामांची जाणीव बायडेन प्रशासनाला करून दिली. तसेच अमेरिकन अभ्यासकांनीही भारताचे महत्त्व अधोरेखित करून बायडेन प्रशासनाला या आघाडीवर सज्जड इशारा दिला होता. दरम्यान, अमेरिकेकडून आवश्यक असलेले सहाय्य वेळेत मिळाल्यास, भारतातील लसनिर्मितीच्या प्रक्रियेला व लसीकरणाच्या मोहीमेला अधिकच वेग मिळेल. कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही बाब निर्णायक ठरू शकते.

leave a reply