अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन तालिबानपेक्षा धोकादायक

- ब्रिटनच्या माजी लष्करी अधिकार्‍याचे टीकास्त्र

लंडन – ‘पाश्‍चात्यांना तालिबानपासून जितका धोका होता त्यापेक्षाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन जास्त धोकादायक आहेत. बायडेन यांनी पाश्‍चात्यांचा विश्‍वासघात केला आहे व याबद्दल मला कोणतीही शंका नाही’, अशा खरमरीत शब्दात ब्रिटनचे माजी लष्करी अधिकारी ट्रेव्हर कोल्ट यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या अफगाण माघारीवर खरमरीत टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी, अफगाणिस्तानमधील अपमानजनक माघारीनंतर अमेरिका ही जागतिक महासत्ता राहिली नसल्याचा टोला लगावला होता.

रिटायर्ड स्पेशल ऑपरेशन्स स्टाफ सार्जंट ट्रेव्हर कोल्ट यांनी दोन दशकांहून अधिक काळ लष्करात सेवा बजावली आहे. यात इराक, अफगाणिस्तान व बोस्नियामधील युद्धांचा समावेश आहे. ब्रिटनकडून कोल्ट यांना सर्वोच्च लष्करी पुरस्कार ‘मिलिटरी क्रॉस’ प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनीही कोल्ट यांचा सन्मान केला होता. अफगाणिस्तानमधील युद्धावर कोल्ट यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन एक्झामिनर’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कोल्ट यांनी बायडेन यांच्यावर सणसणीत कोरडे ओढले आहेत.

‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातून घेतलेली माघार ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. २० वर्षे सुरू असलेले युद्ध त्यांनी पूर्णपणे वाया घालविले. ट्विन टॉवर्सवर बळी पडलेल्या सुमारे तीन हजार जणांसह साडेसहा हजार अमेरिकन्सचा बळी गेला आणि त्यातून काहीही निष्पन्न निघाले नाही. २० वर्षांचा संघर्ष बायडेन यांनी २४ तासांहून कमी वेळात उधळून लावला’, अशी टीका ब्रिटीश अधिकारी कोल्ट यांनी केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम राष्ट्राध्यक्ष आहेत, असा टोलाही कोल्ट यांनी लगावला. ‘बायडेन यांनी दहशतवाद्यांशी मैत्री केली. अमेरिकेचे व्हाईट हाऊस आता पाश्‍चात्यांचा मित्र राहिलेले नाही. जोपर्यंत बायडेन राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत पाश्‍चात्यांना धोका आहे’, अशा शब्दात कोल्ट यांनी बायडेन व अमेरिकेला फटकारले. अफगाणिस्तान माघारीच्या पार्श्‍वभूमीवर आपली अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांशी चर्चा झाली असून, त्यांनीही बायडेन यांच्या निर्णयक्षमतेवर सवाल उपस्थित केले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

यापुढे पाश्‍चात्य देश अमेरिकेबरोबर लष्करी सहकार्य करण्याची शक्यता संपुष्टात आल्याचा इशाराही कोल्ट यांनी दिला. बायडेन नक्की काय करतील हे कोणालाच माहिती नाही आणि एखादी व्यक्ती तुमच्याकडे पाठ फिरविणार असेल, तर तुम्ही त्याला मदत कशासाठी कराल? असा सवाल करीत कोल्ट यांनी बायडेन यांच्या नेत्तृत्त्वाच्या क्षमतेलाच लक्ष्य केले.

अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराची माघार पूर्ण झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन व प्रशासनावर होणार्‍या टीकेची धार अधिकच तीव्र होऊ लागली आहे. अमेरिकेच्या माघारीच्या निर्णयावर ब्रिटनसह इतर नाटो सदस्य देशांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. आता अफगाणिस्तानात लढलेल्या विविध देशांच्या माजी लष्करी अधिकार्‍यांकडूनही बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून कोल्ट यांची नाराजी त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

leave a reply