चीनबरोबरील आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

China-Finance-Americaवॉशिंग्टन – ‘चीनबरोबरील आर्थिक संबंधांचा विचार करता अमेरिकेसमोर अनेक धोरणात्मक पर्याय उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकण्याचा पर्याय देखील वापरण्यात येईल’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची धमकी दिली. गेल्या दोन दिवसात अमेरिकेकडून चीनबरोबर चर्चेचे संकेत देण्यात येत असतानाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ‘फॉरेन पॉलिसी चीफ’ यांग जिएची यांची पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांवर भेट घेतली होती. कोरोनाची साथ व हॉंगकॉंगच्या पार्श्वभूमीवर अमेरिका चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच झालेली ही भेट लक्ष वेधून घेणारी ठरली होती. त्याचवेळी अमेरिकेचे प्रमुख व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथायझर यांनी संसदेत झालेल्या सुनावणीत, सध्या अमेरिका व चीनमधील आर्थिक संबंध तोडणे हा व्यवहार्य पर्याय नसल्याचे सांगितले होते.

China-Americaलायथायझर त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘रॉबर्ट लायथायझर यांचे संसदेतील वक्तव्य ही त्यांची चूक म्हणता येणार नाही. माझ्याकडून चीनबाबतची भूमिका पुरेशा स्पष्टपणे मांडली गेली नसल्याने हे घडले असू शकेल’, असे सांगून ट्रम्प यांनी चीनविरोधात टोकाचे पाऊल उचलणे हा पर्याय अद्याप कायम असल्याची ग्वाही दिली.

चीनबरोबरील आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याची धमकी देण्याची अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात कोरोना साथीच्या मुद्द्यावरून चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेताना ट्रम्प यांनी याबाबत बजावले होते. कोरोना साथीच्या मुद्यावर चीनने घेतलेल्या भूमिकेमुळे आपला दारुण अपेक्षाभंग झाला असून अमेरिका चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकेल अशी धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली होती. संबंध तोडण्याची धमकी देतानाच याने अमेरिकेचे नुकसान होणार नसून ५०० अब्ज डॉलर्सची बचतच होईल, असा टोलाही ट्रम्प यांनी लगावला होता.

leave a reply