भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पावणे चार लाखांवर

नवी दिल्ली – गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या साडे बारा हजारांजवळ आणि एकूण रुग्णांची संख्या पावणे चार लाखांवर पोहोचली आहे. चोवीस तासात महाराष्ट्रातच या साथीने १०० जणांचा बळी गेला आणि ३,७५२ नवे रुग्ण आढळले. मुंबईत दिवसभरात ६७ जण दगावले, तर भिवंडीमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीत कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे.

भारत, कोरोनाच्या रुग्णांची संख्या

गुरुवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात कोरोनाने ३३४ जणांचा बळी घेतला, तर तब्बल १२,८८१ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याच्या बाबतीत हा नवा उच्चांक असून यामुळे देशातील रुग्णांची संख्या ३,६६,९४६ वर पोहोचल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले होते. मात्र रात्रीपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून ही रुग्णसंख्या ३ लाख ७५ हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते.

दिल्लीत चोवीस तासात दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले, तर तर तामिळनाडूतही २,१४१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच ४९ जण दगावले. जम्मू काश्मीरमधीलही कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे पोहोचली आहे. गुजरातमध्ये चोवीस तासात ३१ जणांचा बळी गेला, तर ५१० नवे रुग्ण आढळले.

leave a reply