अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा इराणला सज्जड इशारा

वॉशिंग्टन/तेहरान – इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर, ‘इराकमधील हल्ल्यांमध्ये एका तरी अमेरिकी नागरिकाचा बळी गेला तर त्यासाठी इराणला जबाबदार धरले जाईल. इराणने यावर गांभीर्याने विचार करावा, हा माझा इराणसाठी मैत्रीपूर्ण सल्ला आहे’, असा सज्जड इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. तर या क्षेत्रात काही विपरित घडल्यास, त्याची जबाबदारी अमेरिकेवरच असेल, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

इराकची राजधानी बगदादमधील अतिसंरक्षित क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ग्रीन झोन’ भागातील अमेरिकेच्या दूतावासावर रविवारी रॉकेट हल्ले झाले होते. अमेरिकी दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने काही रॉकेट्स भेदले. तर तीन रॉकेट्स दूतावासाच्या कंपाऊंडवर व आसपासच्या रहिवाशी इमारतींच्या आवारात कोसळले. या हल्ल्यात इराकी नागरिकाचा बळी गेल्याचा दावा केला जातो. अमेरिकी दूतावासाची मुख्य इमारत सुरक्षा भिंतीपासून दूर अंतरावर असल्यामुळे या रॉकेट हल्ल्यांमध्ये दूतावासाचे नुकसान झाले नाही.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या घटनेवर त्वरीत प्रतिक्रिया देऊन इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटना या रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराकमधील दूतावासावरील हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. इराणवर हा आरोप करताना अमेरिकी दूतावासापासून काही अंतरावरुन ताब्यात घेतलेल्या तीन रॉकेट्सचे फोटोग्राफ्स राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रसिद्ध केले.

‘यापुढेही इराकमधील अमेरिकी नागरिकांवर हल्ले चढविण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पण जर इथे एकाही अमेरिकी नागरिकाचा बळी गेला तर त्यासाठी इराणला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल. तेव्हा इराणने पुढे काहीही करण्याआधी यावर विचार करावा’, अशा कठोर शब्दात ट्रम्प यांनी इराणला बजावले. इराणला इशारा देण्याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, हंगामी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाली होती.

वर्षभरापूर्वी देखील इराकमधील अमेरिकी नागरिकांवर झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले होते. इराकमधील ‘कतैब हिजबुल्लाह’ या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात अमेरिकी लष्कराच्या कॉन्ट्रॅक्टरचा बळी गेला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना बजावले होते. यानंतरही इराकमधील अमेरिकी दूतावासावर रॉकेट हल्ले झाले होते.

पुढे ३ जानेवारी रोजी अमेरिकेने बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर दोन मोटारींवर ड्रोन हल्ला चढवून इराणला जबर हादरा दिला होता. या हल्ल्यात इराणचा वरिष्ठ कमांडर कासेम सुलेमानी आणि ‘कतैब’ या संघटनेचा प्रमुख मोहानदिस ठार झाला होता. या पार्श्‍वभूमीवर, इराकमधील आपल्या दूतावासावरील हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

कासेम सुलेमानी यांच्या हत्येला पुढच्या आठवड्यात वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटना अमेरिका किंवा आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले चढविण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातील तैनाती वाढविली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेची बॉम्बर्स विमाने आखातात दाखल झाली. तर दोन दिवसांपूर्वी अमेरिकेची आण्विक पाणबुडी देखील आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह पर्शियन आखातात दाखल झाली आहे.

दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या इशार्‍यावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टीका केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपले अपयश लपविण्यासाठी अमेरिकी नागरिकांचा जीव धोक्यात टाकत असल्याचा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी दिला. तर ट्रम्प यांचा हा इशार्‍या येण्याआधी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची तुलना इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांच्याशी केली होती. ‘इतिहासात दोन वेड्यांचा नेहमीच उल्लेख केला जाईल. इराणवर युद्ध लादणारे इराकचे हुकूमशहा सद्दाम आणि इराणवर आर्थिक युद्ध लादणारे ट्रम्प. सद्दामची जी गत झाली तीच गत ट्रम्प यांची होईल’, अशी जहरी टीका राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केली आहे.

leave a reply