कोरोनाहून अधिक घातक विषाणू पुढील काळात हाहाकार उडवू शकतात

- वरिष्ठ शास्त्रज्ञाचा इशारा

वॉशिंग्टन – कोरोनाहून अधिक घातक विषाणू पुढील काळात जगात हाहाकार माजवू शकतात व त्याने संपूर्ण मानवतेला धोका आहे, असा गंभीर इशारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘जीन-जॅक मुयेंबे तम्फुम’ यांनी दिला. या विषाणूंमध्ये प्राण्यांपासून मानवाला होणार्‍या संसर्गांचा धोका जास्त असल्याचेही प्राध्यापक तम्फुम यांनी बजावले. तम्फुम यांनी १९७६ साली आफ्रिकेत पसरलेल्या ‘एबोला’ विषाणूचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही महिन्यांपूर्वी चीनमधील संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनीही कोरोनाहून अधिक भयावह विषाणू अस्तित्त्वात असल्याचा दावा करून खळबळ उडवली होती.

गेल्या वर्षी चीनच्या वुहानमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरच्या साथीने सध्या जगभरात थैमान घातले असून १७ लाखांहून अधिक जण दगावले आहेत. कोरोनाची लागण होणार्‍यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वेगाने भर पडत असून रुग्णांची संख्या आठ कोटींनजिक पोहोचली आहे. काही प्रमुख देशांमध्ये कोरोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले असले तरी पुढील काही महिन्यात ही साथ वेगाने फैलावण्याचा धोका कायम असल्याचे विविध संशोधक व तज्ज्ञांकडून बजावण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आफ्रिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

प्राध्यापक ‘जीन-जॅक मुयेंबे तम्फुम’ सध्या आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’ या देशात राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेतून जगाच्या इतर भागांमध्ये फैलावू शकतील, अशा विषाणूंच्या संशोधनाचे काम सुरू आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी कोरोनाहून अधिक घातक विषाणूंबाबत बजावले आहे. ‘नजिकच्या काळात जगात नव्या विषाणूंचा प्रसार झालेला पहायला मिळू शकतो. ही गोष्ट मानवतेसाठी मोठा धोका आहे’, असा इशारा प्राध्यापक तम्फुम यांनी दिला.

‘एचआयव्हीपासून ते सार्स व कोरोनापर्यंतचे विषाणू प्राण्यांमध्ये आढळले व त्यातून पुढे मानवात संक्रमित झाले. मानवाला संसर्ग झाल्यानंतर ते प्लेगप्रमाणे वेगाने पसरले. पुढील काळातही अशाच प्रकारे विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. हे विषाणू कोरोनापेक्षाही अधिक घातक व भयंकर असतील’, असा दावा आफ्रिकन शास्त्रज्ञांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने(डब्ल्यूएचओ), अज्ञात असलेल्या एखाद्या विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडविणारी भीषण साथ येऊ शकते आणि या साथीमुळे कोट्यवधी नागरिकांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा दिला होता.

कोरोनाव्हायरसच्या साथीचा फैलाव सुरू झाल्यानंतर चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतील मुख्य संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनीही नव्या साथीबाबत इशारा दिला होता. ‘सध्या जगभरात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस विषाणू म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असून याहून भयावह विषाणू अस्तित्वात आहेत. भविष्यात प्राण्यांमधून मानवात संक्रमित होणार्‍या विषाणूंवर आधीच संशोधन होणे आवश्यक आहे. तरच यापुढील महामारी रोखता येऊ शकते’, असे झेंग्ली यांनी बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर आफ्रिकेतील प्रमुख शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

leave a reply