अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा तालिबानला इशारा

वॉशिंग्टन – ‘तालिबानने २९ फ्रेबुवारी रोजी केलेल्या शांतीकराराचे पालन करावे आणि अफगाणिस्तानातील अमेरिकन्सवर हल्ला चढवू नये’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. सोमवारी रात्री परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी कतारमधील तालिबानचे प्रतिनिधी मुल्लाह बरदार याच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी पॉम्पिओ यांनी तालिबानला शांतीकरारामधील अटींची आठवण करुन दिली. या चर्चेच्या काही तास आधीच अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब आणि मार्टर्स हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. तालिबान आणि अफगाणी लष्कर परस्परांवर या हल्ल्याचे आरोप करीत आहेत. त्याचवेळी तालिबानमध्ये फूट पडलेली असून यातल्या एका गटाने अफगाणिस्तानात भयंकर हल्ल्यांचे सत्र सुरु केल्याचे वृत्त आहे.

तालिबानला इशारा

२९ फेब्रुवारी रोजी कतारच्या दोहामध्ये तालिबान आणि अमेरिकेमध्ये शांतीकरार पार पडला होता. या करारानुसार तालिबानने अफगाणिस्तानातील हल्ले थांबविण्याचे मान्य केले होते. पण या कराराला काही तास उलटत नाही तोच तालिबानने अफगाणिस्तानात रक्तपात सुरु केला. काही काळांपूर्वी तालिबानने एकाच आठवड्यात अफगाणी सुरक्षा दलांवर ४२२ हल्ले चढवून २९१ अफगाणी जवानांचा बळी घेतला होता. आजही तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ल्यांचे सत्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी तालिबानला शांतीकराराशी बांधील राहण्याचा इशारा दिला. तालिबानने अफगाणिस्तानातील अमेरिकन्सवर हल्ले चढवू नये. तसेच अफगाणी भूमीचा वापर दुसऱ्या कोणालाही करु देऊ नये. शांतीकरारात तालिबानने अफगाणी भूमी अल-कायदा या दहशतवादी संघटनेला वापरु देणार नाही, असे कबुल केले होते. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी याची आठवण करुन दिली. तालिबान अमेरिकेच्या विरोधात हल्ले चढवणार नाही, असे आश्वासन तालिबानचे प्रतिनिधी बरदार याने यावेळी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांना दिले. तसेच करारानुसार तालिबान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अमेरिका आणि इतर कोणत्याही देशाविरोधात करणार नाही, असे बरदार पुढे म्हणाला. दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद कतार दौऱ्यावर असून ते पाकिस्तानला भेट देणार आहेत. यावेळी अफगाणिस्तानबाबत चर्चा होणार आहे.

leave a reply