अमेरिकी सिनेटकडून चिनी कंपन्यांची हकालपट्टी करणाऱ्या विधेयकाला मंजुरी

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोना साथीच्या आड जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन त्यांच्यावर ताबा मिळविण्याचे प्रयत्न करणाऱ्या चीनला अमेरिकेने नवा झटका दिला. अमेरिकेच्या सिनेटने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी कंपन्यांची हकालपट्टी करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. विधेयकात परदेशी कंपन्यांचा उल्लेख असला तरी ते चिनी कंपन्यांनाच लक्ष्य करणारे असल्याचे मानले जाते.

रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर जॉन केनेडी व डेमोक्रॅट पार्टीचे क्रिस व्हॅन हॉलन यांनी परदेशी कंपन्यांसंदर्भातील विधेयक सिनेटमध्ये सादर केले होते. ‘चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी फसवणूक करीत आहे आणि नवे विधेयक अमेरिकन शेअर बाजारांची फसवणूक रोखणारे आहे. अमेरिकेसाठी धोकादायक ठरणाऱ्या कंपन्यांनी अमेरिकी जनतेच्या शेअर बाजारातील पैशांवर डल्ला मारावा, अशी आमची इच्छा नाही’, या शब्दात सिनेटर जॉन केनेडी यांनी विधेयकाचे समर्थन केले.

‘होल्डिंग फॉरेन कंपनीज अकाउंटेबल ऍक्ट’ नावाच्या या विधेयकात, अमेरिकेत कार्यरत कंपन्यांना त्या परकीय राजवटीच्या नियंत्रणाखाली नाहीत हे सिद्ध करावे लागणार आहे. तसे नाही करता आले तर त्या कंपनीची अमेरिकी शेअरबाजारातील नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘लकीन कॉफी’ या चिनी कंपनीला उत्पन्नात फेरफार केल्याच्या प्रकरणात नोटीस देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिनेटमध्ये मंजूर झालेले विधेयक लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिकेतील हे नवे विधेयक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने चीनविरोधात सुरु केलेल्या राजनैतिक युद्धाचाच भाग दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वीच चीनबरोबरील व्यापारी करार रद्द करण्याचा तसेच चीनवर नवे कर आणि निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. सायबरहल्ले, तंत्रज्ञान व बुद्धिसंपदेची चोरी या मुद्यावरूनही अमेरिकेने चीनला धारेवर धरले असून कारवाईची धमकी दिली आहे.

अमेरिकी सिनेटमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर अमेरिकेतील आघाडीच्या चिनी कंपन्यांचे शेअर एक ते दोन टक्क्यांनी घसरले आहेत.

leave a reply