‘अम्फान’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ८२ जणांचा बळी

कोलकाता – ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या तडाख्यात पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा बळी गेला आहे. या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून युद्ध पातळीवर ‘एनडीआरएफ’चे बचावकार्य सुरू आहे. बांगलादेशलला ही या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून यात १० जण ठार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या जनतेसोबत सारा देश उभा असून त्यांना सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच गृहमंत्रालयाकडून पश्चिम बंगाल आणि ओडिशात पथके पाठविण्यात येणार असून त्यांच्यकडून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकले. त्या आधीच पाच लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पण या वादळात ७२ जणांचा बळी गेला. वादळाची तीव्रता पाहता बळींची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. या भयंकर वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये हजारोहूंन अधिक घरांची पडझड झाली. कृषीक्षेत्राचे सर्वात मोठे नुकसान झाले. सर्व यंत्रणा कोलमडली आहे. यावेळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोलकाता विमानतळावर पाणी साचले होते. असे भीषण वादळ याआधी कधी पाहिले नव्हते, असे या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणाल्या. तसेच त्यांनी केंद्र सरकारकडे राज्यात एनडीआरएफची अतिरिक्त तुकडी पाचारण करण्याची विनंती केली. त्यानुसार एनडीआरएफच्या आणखी चार अतिरीक्त पथके पश्चिम बंगालसाठी रवाना झाली आहेत.

कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे एनडीआरएफ समोर सर्वात मोठे आव्हान आहे. पण सोशल डिस्टसिंग आणि इतर सुरक्षाविषयक नियम पाळून बचावकार्य सुरु असल्याचे ‘एनडीआरएफ’चे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितले. ओडिशामध्ये या वादळाची तीव्रता कमी होती. वादळाच्या आधीच ओडिशामधून दोन लाख जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. या राज्यात वादळाचा कृषीक्षेत्राला फटका बसला. येत्या २४ किंवा ४८ तासात ओडिशामधील परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे हवामान विभागाने सांगितले.

हवामान खात्याने आधीच या वादळाबाबत सर्तक केल्यामुळे मोठे नुकसान टळल्याचे ओडिशाच्या सरकारने सांगितले. त्यासाठी त्यांनी हवामान खात्याचे आभार मानले. दरम्यान, बांगलादेशला अम्फान चक्रीवादळाचा फटका बसला असून यात १० जणांचा बळी गेला आहे. तर या देशातल्या लाखो जणांना याचा फटका बसला आहे. सुंदरबन क्षेत्रात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. येत्या काही तासात ईशान्य भारतात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

leave a reply