अमेरिकेने अफगाणींना पाकिस्तानच्या गुन्ह्याची शिक्षा देऊ नये

- अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई

काबुल – तालिबानची राजवट आल्यानंतर अमेरिकेने आपल्या ताब्यात असलेला अफगाणिस्तानचा सात अब्ज डॉलर्सचा निधी गोठविला होता. या निधीतील अर्धी रक्कम ९/११च्या दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश बायडेन प्रशासनाने दिले आहेत. हा निर्णय म्हणजे अफगाणींवर अन्याय ठरतो, असे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी म्हटले आहे. ९/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानात ठार झाला आणि पाकिस्तानच त्याला अफगाणिस्तानात घेऊन आले होते, ही बाब करझाई यांनी लक्षात आणून दिली आहे.

अमेरिकेने अफगाणींना पाकिस्तानच्या गुन्ह्याची शिक्षा देऊ नये - अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईअफगाणी जनतेने काही लादेनला आपल्या देशात बोलावले नव्हते. पाकिस्ताननेच लादेनला काबुलपर्यंत आणले होते. पुढच्या काळात लादेन अफगाणिस्तानातून पाकिस्तानात परतला. पाकिस्तानच्या भूमीतच लादेन ठार झाला होता. त्यामुळे ९/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या ओसामा बिन लादेनशी अफगाणिस्तानचा नाही, तर पाकिस्तानचा संबंध आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या गुन्ह्याची शिक्षा अफगाणी जनतेला का दिली जात आहे? असा प्रश्‍न करझाई यांनी केला. अफगाणी वृत्तवाहिनीशी बोलताना माजी राष्ट्राध्यक्ष करझाई बोलत होते.

अमेरिकेने अफगाणिस्तानचा निधी परत करावा, अशी मागणी तालिबानने केली आहे. या मुद्यावर सारे अफगाणी तालिबानच्या सोबत आहेत, असे करझाई म्हणाले. हा निधी अमेरिकेने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेत जमा करावा. हा निधी अफगाणिस्तानच्या दैनंदिन गरजांसाठी वापरला जाऊ नये. तो राखून ठेवण्याची गरज आहे व त्यात वेळोवेळी भर घालायला हवी, अशी मागणी करझाई यांनी केली. दरम्यान, अफगाणिस्तानचा निधी ९/११च्या पीडितांना देण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाविरोधात अफगाणिस्तानात निदर्शने सुरू झाली आहेत. गेल्या वीस वर्षांच्या कालावधित अमेरिकेने हजारो अफगाणींचा बळी घेतला होता. त्याची आर्थिक भरपाई देखील अमेरिकेने करावी, अशी मागणी हे अफगाणी निदर्शक करीत होते.

तालिबानने देखील अमेरिकेच्या या निर्णयावर जहाल प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचा नैतिक र्‍हास झाल्याचे यातून दिसत असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. आता करझाई यांनी पाकिस्तानच्या अपराधासाठी अफगाणींना शिक्षा देऊ नका, अशी मागणी करून अमेरिकेने हा निधी पाकिस्तानकडून वसूल करावा, असे सुचविले आहे.

अफगाणिस्तानातील मानहानीकारक माघारीनंतर, अमेरिकेतही आपल्या देशाच्या या अपयशाला पाकिस्तानचा विश्‍वासघात जबाबदार असल्याची जोरदार टीका झाली होती. याची किंमत पाकिस्तानला चुकती करण्यास भाग पाडायलाच हवे कारण पाकिस्ताननेच तालिबानचे भरणपोषण करून त्यांना सुरक्षा पुरविली होती, असे आरोप अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी तसेच माजी लष्करी व गुप्तचर अधिकार्‍यांनी केले होते. या कारणामुळे सत्तेवर आल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी अद्याप फोनवरून चर्चा केलेली नाही. त्यातच पाकिस्तानचे सरकार अफगाणिस्तानात चीनचा प्रभाव वाढविण्यासाठी सहाय्य करीत असल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीत करझाई यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या अपराधांची आठवण करून दिली. अफगाणिस्तानचा निधी वापरून अफगाणी जनतेला शिक्षा देण्यापेक्षा, अमेरिकेने ९/११चा सूत्रधार असलेल्या लादेनला आश्रय देणार्‍या पाकिस्तानला धारेवर धरावे, ही करझाई यांची मागणी लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply