अफगाणिस्तानात १० लाख मुलांचा कुपोषणाने बळी जाईल

- युनिसेफचा गंभीर इशारा

कुपोषणाने बळी जाईलकाबूल – अफगाणी जनतेपर्यंत मानवतावादी सहाय्य लवकरात लवकर पोहोचले नाही, दहा लाखांहून अधिक मुलांचा कुपोषणाने बळी जाईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणारी वैद्यकीय केंद्रे देखील अफगाणिस्तानात नसल्यामुळे हे संकट अधिकच भयानक होत असल्याचा दावा अफगाणी माध्यमे करीत आहेत.

अफगाणी मुलांसाठी खुराक पुरविला जात असला तरी तो फारच त्रोटक असल्याची माहिती युनिसेफने दिली आहे. अफगाणी मुलांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी तातडीच्या कारवाईची आवश्यकता असल्याचे आवाहन युनिसेफने केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या संघटनेच्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानमध्ये सध्या २.४४ कोटी जणांना मानवतावादी सहाय्याची आवश्यकता आहे. यामध्ये १.३१ कोटी मुलांचा समावेश असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

यातही पाच वर्षांखालील ११ लाखाहून अधिक मुले गंभीर कुपोषणाचा सामना करीत असल्याची माहिती या संघटनेने दिली. अन्नटंचाई, शुद्ध पाणीपुरवठ्यामध्ये येणार्‍या अडचणी आणि अस्वच्छता यामुळे कुपोषण रोखण्यात अडचणी येत आहेत. अशुद्ध पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेमुळे २०२१ साली अफगाणिस्तानात ६० हजारांहून अधिक मुलांना गोवर झाली होती, याकडेही या संघटनेने लक्ष वेधले. अशी हजारो अफगाणी मुले स्थानिक रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवांच्या प्रतिक्षेत असल्याचा दावा या संघटनेने केला.

कुपोषणाने बळी जाईलअफगाणिस्तानच्या सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील आपल्या देशातील कुपोषणाच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सध्या आपल्या देशात ४४ लाख मुले कुपोषणाने बाधित असल्याचा दावा तालिबान करीत आहे. अफगाणी मुलांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय केंद्रे बंद पडल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत असल्याचे तालिबानच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले आहे. अफगाणी वृत्तवाहिनीने तालिबानी कमांडरच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली.

वर्ल्ड फूड प्रोग्रामने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना, गृहयुद्ध, दुष्काळ आणि आर्थिक संकट या समस्या कुपोषणाच्या संकटात भर टाकत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून या देशातील मानवतावादी सहाय्याचे संकट अधिकच भीषण होऊ लागल्याचा दावा ही संघटना करीत आहे.

तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आल्यापासून सुमारे सात लाखांहून अधिक अफगाणी बेघर झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणखी एका संघटनेने केला. याआधी गेल्या पाच वर्षांमध्ये ५५ लाख अफगाणी विस्थापित झाले होते.

leave a reply