अमेरिकेने आखाती देशांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सोडून द्यावे

-चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई

बीजिंग – ‘अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी जुन्या सवयी सोडून द्याव्या. प्रत्येकवेळी आखाती देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणे आणि पाश्चिमात्य देशांच्या मर्जीप्रमाणे आखातात बदल घडविणे सोडून द्यावे’, अशी जळजळीत टीका चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे ताशेरे ओढल्याचे दिसत आहे.

china-wang-yiगेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. सौदीसह इतर अरब-आखाती देशांच्या नेत्यांबरोबरही बायडेन यांची बैठक घेतली होती. यामध्ये आखाती क्षेत्रातील धोक्यांबाबत चर्चा पार पडली होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या आखात दौऱ्याला लक्ष्य करून चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टीका केली. सिरियन परराष्ट्रमंत्री फैसल मेकदाद यांच्याबरोबर व्हर्च्युअल चर्चा केल्यानंतर परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी अमेरिकेवर निशाणा साधला.

अमेरिका आखाती क्षेत्रातून माघार घेऊन हे क्षेत्र रशिया, चीन व इराणसाठी मोकळे करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या धोरणांना लक्ष्य केले. इंधनसंपन्न असलेल्या आखाती क्षेत्रात प्रभाव वाढविण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी चीन काही दशकांपासून प्रयत्न करीत असून बायडेन प्रशासनाच्या कमकुवत धोरणांमुळे चीनसमोर आपली महत्त्वाकांक्षा साधण्याची संधी चालून आल्याचे दावे अमेरिकेतील काही विश्लेषकांनी केले होते.

leave a reply