अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’कडून लष्करी उपग्रह प्रक्षेपित

वॉशिंग्टन – अमेरिकन ‘स्पेस फोर्स’चा भाग असलेल्या ‘स्पेस सफारी युनिट’ने ‘ओडेसी’ नावाचा लष्करी उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला आहे. ‘ओडेसी’ हा ‘सर्व्हिलन्स सॅटेलाईट’ प्रकारातील उपग्रह असून अंतराळातील धोकादायक घटक ओळखून त्यावर लक्ष ठेवण्याचे काम करील, अशी माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेने उभारलेल्या ‘स्पेस फोर्स’च्या युनिटकडून स्वतंत्र उपग्रह अंतराळात सोडण्याची ही पहिलीच घटना आहे.

अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’कडून लष्करी उपग्रह प्रक्षेपितरविवारी ‘युएस स्पेस फोर्स’च्या व्हँडनबर्ग बेसवरून ‘ओडेसी’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ‘नॉथ्रोप ग्रुमन’ कंपनीच्या ‘एल-१०११ कॅरिअर एअरक्राफ्ट’ व ‘पेगॅसस रॉकेट’च्या सहाय्याने उपग्रह अंतराळात सोडण्यात आल्याची माहिती स्पेस फोर्सच्या अधिकार्‍यांनी दिली. कमीत कमी वेळात एखादा उपग्रह विकसित करून तो अंतराळात सोडणे हा ‘ओडेसी’ उपग्रहाच्या मोहिमेचा उद्देश होता, असे ‘स्पेस फोर्स’कडून देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

‘युएस स्पेस फोर्स’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ‘ओडेसी’ उपग्रह एक वर्षाच्या आत विकसित करून प्रक्षेपित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या उपग्रहाची निर्मिती, चाचणी व प्रक्षेपण यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. मात्र ‘युएस स्पेस फोर्स’ने वर्षाच्या आत उपग्रह विकसित करून प्रक्षेपित करणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. ‘स्पेस फोर्स’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘स्पेस सफारी’ या नव्या युनिटवर हीच जबाबदारी असल्याचे ‘युएस स्पेस फोर्स’कडून सांगण्यात आले.अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’कडून लष्करी उपग्रह प्रक्षेपित

दरम्यान, चीन व रशियाच्या अंतराळातील वाढत्या हालचाली रोखण्यासाठी नाटोने पुढाकार घेतला आहे. नाटोच्या ‘आर्टिकल ५’मध्ये यापुढे अंतराळक्षेत्राचाही समावेश असेल, अशी घोषणा नाटोचे महासचिव जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केली. ‘आर्टिकल ५’नुसार नाटोच्या सदस्य देशावर झालेला कोणताही हल्ला हा नाटोवरील हल्ला समजून नाटोचे इतर सदस्य देश त्याला प्रत्युत्तर देतील, अशी तरतूद आहे. सध्या या तरतुदीत, पारंपारिक स्वरुपाचा हल्ला तसेच सायबरहल्ल्याचा समावेश आहे. मात्र सोमवारी झालेल्या नाटोच्या बैठकीपूर्वी त्यात अंतराळाचाही समावेश करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ‘उपग्रह अथवा अंतराळातील इतर यंत्रणांवर झालेला हल्ला तसेच अंतराळातून करण्यात आलेला हल्ला या दोन्ही गोष्टी आर्टिकल ५चा वापर करण्यास भाग पाडू शकतात’, असे जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. यापूर्वी २०१९ साली नाटोने अंतराळक्षेत्र हे पाचवे ‘युद्धक्षेत्र’(डोमेन) असल्याचे जाहीर केले होते.

पृथ्वीभोवतालच्या कक्षेत सध्या जवळपास दोन हजार उपग्रह भ्रमण करीत असून त्यातील एक हजारांहून अधिक उपग्रह नाटो सदस्य देशांचे आहेत.

leave a reply