अमेरिकेतील ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’चा साठा चार दशकांमधील नीचांकी पातळीवर

Us Strategic Petroleum Reserve's reservesवॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धामुळे उडालेला इंधनदरांचा भडका व वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठा खुला करण्याचा निर्णय घेतला होता. आणीबाणीच्या काळात अमेरिकेच्या इंधनविषयक गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या साठ्यात प्रचंड वेगाने घट होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात जाहीर आकडेवारीनुसार, हा साठा चार दशकांमधील नीचांकी पातळीवर आल्याची माहिती अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने दिली.

Strategic-Petroleum-Reservesराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत तीनदा ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठा खुला करण्याबाबत निर्णय घेतले होते. त्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तसेच यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशांचा समावेश आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस बायडेन प्रशासनाने तब्बल 18 कोटी बॅरल्स इंधनसाठा खुला करण्याचा निर्णय घेतला होता. दर दिवशी 10 लाख बॅरल्स मोकळे करीत सहा महिने ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठ्यातून इंधन मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले होते.

us_strategic_oil_reserveया निर्णयानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठ्यातून इंधन बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एक कोटी बॅरल्स इंधन खुले करण्यात येईल, असे सांगण्यात येते. बायडेन यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठा 1984 सालानंतर प्रथमच नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सध्या अमेरिकेच्या राखीव इंधनसाठ्यात 42 कोटी, 72 लाख बॅरल्स इतकेच इंधन शिल्लक आहे.

अमेरिकेला प्रतिदिन लागणाऱ्या कच्च्या तेलाचा विचार करता सध्या असलेला राखीव इंधनसाठा आणीबाणीच्या काळात जेमतेम 50 दिवसांसाठीच पुरेल, असा इशारा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या आघाडीच्या दैनिकाने दिला आहे. या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात बायडेन प्रशासनाने इंधनाबाबत घेतलेल्या दुटप्पी धोरणांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन एकीकडे अमेरिकेत इंधनाचे उत्पादन वाढू नये म्हणून निर्णय घेत असून दुसरीकडे सौदी अरेबिया व व्हेनेझुएलासारख्या देशांना कच्च्या तेलाचे उत्पादन तसेच निर्यात वाढविण्यासाठी भरीस घालत आहेत. या धोरणामुळे अमेरिकेची इंधनसुरक्षा धोक्यात येऊ शकते, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, बायडेन यांनी ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठ्यातून इंधन मोकळे करण्याचे थांबविल्यानंतर अमेरिकी कंपन्या कॅनडाकडून इंधन खरेदी करतील, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. असे झाल्यास इंधनबाजारपेठेत पुन्हा एकदा दरांचा भडका उडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे.

leave a reply