चीनच्या राष्ट्राध्यक्षांबाबतचा संभ्रम कायम

बीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अफवा सलग दुसऱ्या दिवशीही आपला प्रभाव दाखवित होत्या. तरीही चीनकडून अधिकृत पातळीवर याचा खुलासा आलेला नाही. त्यामुळे जगभरातील माध्यमांना या ‘अफवेची’ दखल घेऊन या विषयावर बातम्या प्रसिद्ध कराव्या लागल्या. अजूनही चीनमधल्या विश्वासार्ह बातम्या जगासमोर येत असून अद्याप चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून न आलेला खुलासा हीच जिनपिंग यांच्या भवितव्याबाबतची सर्वात मोठी संशयास्पद बाब ठरते आहे.

Xi-Jinping-Li-Qiaomingमाध्यमे तसेच चीनमध्ये काहीतरी संशयास्पद चालू आहे, असे सांगणारे विश्लेषक अजूनही याबाबतची ठोस माहिती देऊ शकलेले नाहीत. पण चीनच्या संशयास्पद हालचालींमध्ये अधिकच वाढ झाली असून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या साऱ्या गदारोळात पाळलेले मौन सूचक मानले जाते. चीनच्या ‘पीएलए’चे वरिष्ठ अधिकारी जनरल ली किओमिंग लवकरच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या जागी दिसणार का? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. कारण राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आता पहिल्याइतके पॉवरफुल राहिलेले नाहीत, हा दावा जोर पकडत आहे. काही काळापूर्वी जिनपिंग यांनी हटविलेले लष्करी अधिकारी आता पीएलएच्या बैठकांना उपस्थित राहत आहेत, ही बाबच बोलकी ठरते, असे सोशल मीडियावर काहीजण सांगत आहेत.

चीनमधून इतका धूर निघत आहे, याचाच अर्थ कुठेतरी फार मोठी आग लागलेली आहे हे निश्चित, असे चिनी वंशाचे अमेरिकी विश्लेषक गॉर्डन चँग यांनी म्हटले आहे. मात्र ते देखील या आगीबाबत अधिक माहिती देऊ शकलेले नाहीत. पण जिनपिंग यांच्या सत्तेची अशारितीने अखेर होणे ही काही तितकीशी चांगली बाब ठरणार नाही. कारण ते सत्तेवरून गेले तरी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची सत्ता तशीच कायम राहणार आहे. जिनपिंग यांच्या जागी दुसरे नेते येऊन त्याने चीनच्या सध्याच्या राजकीय व्यवस्थेत बदल होणार नाही, असा दावा गॉर्डन चँग यांन केला आहे. त्याला इतर काही विश्लेषक दुजोरा देत आहे.

जिनपिंग यांची सत्ता उलथण्यात यश मिळालेला चीनचा दुसरा नेता तैवानबाबत आक्रमक निर्णय घेऊन आपले नेतृत्त्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करील. ही बाब जगासाठी घातक ठरू शकते, कारण यामुळे युद्ध भडकण्याचा धोका वाढेल, असे विश्लेषक बजावत आहेत.

जिनपिंग चीनमध्ये, विशेषतः त्यांच्या कम्युनिस्ट पक्षातील पॉलिटब्युरोमध्ये अप्रिय ठरले होते, त्यामागे तैवानबाबत त्यांनी स्वीकारलेली भूमिका, हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. तैवान उघडपणे चीनला आव्हान देत असताना व त्यासाठी अमेरिका तैवानला सहाय्य करीत असताना, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी त्याविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली नाही, असा आक्षेप चीनमधून घेतला जात होता. इतकेच नाही तर लडाखच्या एलएसीवरील भारताविरोधात पेटलेल्या संघर्षातही जिनपिंग यांना चीनची प्रतिष्ठा सांभाळता आली नाही, असे आक्षेप त्यांच्यावर घेतले जात होते.

या साऱ्याचा फटका जिनपिंग यांच्या प्रतिमेला बसला आणि त्यामुळे ते अधिकच अडचणीत आल्याचे दावे केले जातात. म्हणूनच त्यांची जागा घेणारा नवा नेता चीनमध्ये आलाच, तर तो अधिक आक्रमकच असेल, असेल, या विश्लेषकांच्या दाव्याला फार मोठा आधार असल्याचे दिसत आहे.

leave a reply