इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला अमेरिकेचा पाठिंबा

- व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया

पाठिंबावॉशिंग्टन – ‘इराणच्या आक्रमक भूमिकेमुळे या क्षेत्राला निर्माण झालेल्या धोक्यावर अमेरिका आणि इस्रायलमध्ये एकमत आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारालाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा पूर्ण पाठिंबा आहे’, अशी घोषणा व्हाईट हाऊसने केली. अमेरिका आणि इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये पार पडलेल्या पहिल्या बैठकीनंतर व्हाईट हाऊसने ही प्रतिक्रिया दिली.

इस्रायलच्या सुरक्षा अधिकार्‍यांचे विशेष शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. अमेरिकेने इराणबरोबर सुरू केलेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, नेत्यान्याहू सरकारची स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिर बेन-शबात यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांची भेट घेतली. या भेटीत अमेरिका आणि इस्रायलच्या अधिकार्‍यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत गंभीर चर्चा केल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले. सुलिवन यांनी व्हिएन्नातील चर्चेबाबतची माहिती शबात यांनी पुरविल्याचे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केले.

इस्रायलची सुरक्षा हे अमेरिकेच्या आखातातील धोरणाचे मध्यवर्ती सूत्र राहिले आहे. पण बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, यात बदल होऊ लागल्याचे दिसते. इराणबरोबरच्या अणुकरारासाठी प्रयत्न करून बायडेन इस्रायलची सुरक्षा धोक्यात आणत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे.

अमेरिकेच्या या धोरणात बदल व्हावा, यासाठी शबात यांच्या अध्यक्षतेखाली इस्रायली शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल झाले आहे. मात्र इस्रायली शिष्टमंडळाच्या दौर्‍यानंतरही अमेरिकेच्या भूमिकेत बदल होणार नसल्याचे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी आधीच जाहीर केले होते.

leave a reply