अमेरिका सौदी व युएईला पॅट्रियॉट, थाडने सज्ज करणार

-अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

bidenवॉशिंग्टन – गेले वर्षभर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करुन सौदी अरेबिया आणि युएईला हवाई सुरक्षा यंत्रणा नाकारणाऱ्या बायडेन प्रशासनाने आपल्या भूमिकेत मोठा बदल केला. सौदी व युएईला पॅट्रियॉट आणि थाड या प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून सौदी व युएईला असलेला धोका अधोरेखित करून अमेरिकेने ही घोषणा केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

us-thaadपत्रकार जमाल खशोगी यांची हत्या व येमेनमधील सौदीच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करून बायडेन प्रशासनाने गेल्या वर्षी सौदी अरेबिया व युएईवर निर्बंध लादले होते. बायडेन प्रशासनाने सौदी व युएईतील पॅट्रियॉट क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेसाठी इंटरसेप्टर पुरविण्याचे नाकारले होते. तसेच सौदी व युएईमध्ये तैनात हवाई सुरक्षा यंत्रणा अमेरिकेने माघारी घेतली होती. याशिवाय सौदी व युएईच्या राजधानींवर क्षेपणास्त्र हल्ले चढविणाऱ्या येमेनमधील हौथी बंडखोरांना बायडेन प्रशासनाने दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळले होते.

us-patriotयाचा फटका सौदी व युएईच्या सुरक्षेला बसला होता. पण युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे संकट उभे राहिले. यानंतर बायडेन प्रशासनाला सौदी व युएईकडे इंधनाचे उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन करावे लागले. मात्र, सौदी व युएईच्या नेतृत्त्वाने अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे फोन घेण्याचे टाळले होते. या दोन्ही अरब देशांनी इंधनाचे उत्पादन वाढविण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आपल्या भूमिकेत बदल करून सौदीचा दौरा करावा लागला आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घ्यावी लागली होती.

या भेटीनंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाने सौदी व युएईसाठी पाच अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीची हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची घोषणा केली. यानुसार अमेरिका सौदीला 3.05 अब्ज डॉलर्स किंमतीचे पॅट्रियॉट यंत्रणेसाठी आवश्यक जवळपास 300 इंटरसेप्टर पुरविणार आहे. तर युएईला अमेरिका 2.25 अब्ज डॉलर्सची थाड ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार आहे. यामुळे रियाध, दुबई, अबु धाबी आणि जेद्दा या प्रमुख शहरांना लक्ष्य करणारी हौथी बंडखोरांची क्षेपणास्त्रे व रॉकेट्स पाडता येतील, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

दरम्यान, येमेनमधील हौथी बंडखोरांना इराणचे समर्थन आहे. त्यामुळे बायडेन प्रशासनाने हौथींविरोधी कारवाईसाठी सौदी व युएईला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवून इराणला इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply