अमेरिकेला इराण, इराक व सिरियाचे तुकडे करायचे आहेत – इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा आरोप

तेहरान – ‘अमेरिकेला इराण, इराक आणि सिरियाचे तुकडे करून या क्षेत्रावर आपले नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे. पण इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या नेतृत्वामुळे अमेरिका आपल्या उद्दिष्टांमध्ये अपयशी ठरली आहे’, असा आरोप इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर जनरल आमिर अली हाजिझादेह यांनी केला. त्याचबरोबर इराण कासेम सुलेमानी यांची हत्या कधीही विसरली जाणार नाही व त्याचा नक्की सूड घेतला जाईल, अशी धमकी हाजिझादेह यांनी दिली.

सिरियाचे तुकडेगेल्या काही दिवसांपासून इराण, इराक आणि सिरियातील अमेरिकाविरोध तीव्र होऊ लागला आहे. या तीनही देशांमधील इराणसंलग्न गट इराक व सिरियातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीची मागणी करीत आहेत. अमेरिकेच्या लष्कराने आमच्या देशातून चालते व्हावे, अशी मागणी इराकमधील काही इराणसंलग्न राजकीय नेत्यांनी केली. तर इराणच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. इराक व इराणमधील या अमेरिकाविरोधी मोहिमेमागे इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स असल्याचा दावा केला जातो.

दोन दिवसांपूर्वी इराणच्या कोम शहरात आयोजित कार्यक्रमात रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एअरोस्पेस फोर्सचे ब्रिगेडिअर जनरल हाजिझादेह यांनी या मुद्यावरुन अमेरिकेवर टीका केली. इराक आणि सिरियातील अमेरिकी लष्कराच्या तैनातीवर हाजिझादेह यांनी प्रश्‍न उपस्थित केले. ‘शत्रूदेश अमेरिका दररोज या क्षेत्राचा तसेच येथील खनिजसंपत्तीचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. इराक, सिरियामध्ये तैनात अमेरिका इराणसह या दोन्ही देशांचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचे नेतृत्व आणि इराणसह या क्षेत्रातील जनतेची जागरूकता, यामुळे अमेरिकेची योजना धुळीस मिळाली’, असा आरोप हाजिझादेह यांनी केला.

सिरियाचे तुकडे‘इराण, इराक व सिरियाचे तुकडे करण्याची अमेरिकेची ही योजना रिव्होल्युशनरी गार्ड्स यशस्वी होऊ देणार नाही. इराणचे जनता जनरल कासेम सुलेमानीची हत्या अजूनही विसरलेली नाही. सुलेमानी यांच्या हत्येने या क्षेत्रातील देशांना खडबडून जागे केले आहे’, असा दावा हाजिझादेह यांनी केला. काही दिवसांपूर्वी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या आणखी एका कमांडरने इराक व सिरियासह या क्षेत्रातील अमेरिकेच्या सैन्यतैनातीवर टीका केली होती. अमेरिकेने ताबडतोब या क्षेत्रातून माघार घ्यावी, अशी मागणी या कमांडरने केली होती.

गेल्या वर्षी अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख जनरल सुलेमानी यांना ठार केले होते. पण अमेरिकेने सुलेमानी यांची हत्या केल्याचा ठपका ठेवून इराणने याचा सूड घेण्याची धमकी दिली होती. याचा एक भाग म्हणून, इराक आणि सिरियातून अमेरिकेच्या लष्कराची हकालपट्टी करण्याचे इराणच्या उपराष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले होते. त्यानंतर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ले वाढले आहेत.

leave a reply