जपान, तैवानच्या सुरक्षेवरुन अमेरिकेचा चीनला इशारा

चीनला इशारा

वॉशिंग्टन/टोकिओ/तैपेई – ‘ईस्ट चायना सी’मधील सेंकाकू द्विपसमुहावर जपानचा अधिकार आहे. त्यामुळे जपानबरोबर सुरक्षाविषयक सहकार्य असलेली अमेरिका देखील या द्विपसमुहाच्या सुरक्षेसाठी बांधिल असल्याची घोषणा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने केली. तर तैवानच्या हवाई हद्दीत लढाऊ विमाने आणि अण्वस्त्रसज्ज बॉम्बर विमाने रवाने करणार्‍या चीनला अमेरिकेने खडे बोल सुनावले आहेत. अमेरिका तैवानला आत्मसंरक्षणासाठी सहाय्य करणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. जपान आणि तैवानबाबत अमेरिकेच्या नव्या प्रशासनाने केलेली विधाने चीनला समज देण्यासाठी असल्याचा दावा केला जातो.

अमेरिकेचे नवनियुक्त संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांच्यात शनिवारी फोनवरुन चर्चा पार पडली. यात अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सेंकाकूवरील जपानचा दावा कायदेशीर असल्याचे ठासून सांगितले. तसेच अमेरिका आणि जपानमधील संरक्षण करारातील ‘कलम ४’नुसार, ईस्ट चायना सीमधील जपानशी संबंधित परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झालाच तर अमेरिका त्याच्या सुरक्षेसाठी बांधिल असेल’, असे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगानने एका पत्रकातून जाहीर केले.

चीनला इशारा

त्याचबरोबर जपानमध्ये तैनात अमेरिकी जवानांच्या फेरतैनातीवरही उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली. या व्यतिरिक्त उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम, क्षेपणास्त्रे आणि जपानमधील कोरोनाव्हायरसच्या मुद्यांवरही माहितीचे आदानप्रदान झाले. दोन दिवसांपूर्वीच जपानने सेंकाकू द्विपसमुह आणि साऊथ चायना सीच्या मुद्यावरुन अमेरिकेला आवाहन केले होते. या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेतील बायडेन प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जपानने म्हटले होते.

चीनला इशारा

अमेरिकेने तैवानबाबत चीन दाखवित असलेल्या आक्रमकतेवर टीका केली. शनिवारी चीनच्या आठ लढाऊ तर चार बॉम्बर विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती. चीनच्या विमानांनी केलेल्या या घुसखोरीवर तैवानने टीका केली होती. तसेच आपली लढाऊ विमाने रवाना करून चीनच्या विमानांना पिटाळून लावले होते. यावर अमेरिकेची प्रतिक्रिया उमटली आहे.

‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांची सुरक्षा, समृद्धीसाठी अमेरिका प्रयत्नशील असेल. या मित्रदेशांमध्ये लोकशाहीवादी तैवानचा देखील समावेश आहे. तैवानला आत्मसंरक्षणासाठी अमेरिका आवश्यक ते सहाय्य करील’, अशी घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

ईस्ट चायना सी’तील सेंकाकूच्या द्विपसमुहावर आपला अधिकार असल्याचा चीनचा दावा आहे. तर तैवान हा देखील आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. इतर कुठल्याही देशाने तैवानशी राजकीय व लष्करी सहकार्य प्रस्थापित करू नये, अशी धमकी चीनने दिली होती. पण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने तैवानबाबतचे धोरण बदलून या देशाला अधिक संरक्षण देण्याची तयारी केली आहे.

leave a reply